संगीत मैफल : स्वराभिषेकात नाशिककर चिंब

आयएमए www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रसिकमनावर अधिराज्य गाजविणारी एकाहून एक सरस गीते सादर व्हावीत अन् त्यांना मुक्तकंठाने दाद देताना ओठांतून नकळत एवढेच शब्द बाहेर पडावेत, ‘वाह! क्या बात है!’ आयएमए सभागृहाच्या प्रांगणात रविवारी (दि. 23) पहाटे शब्दसुरांचा सडा पडला अन् कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेल्या कोमल सुरावटींनी रसिकांची दिवाळीतील सकाळ अधिकच रम्य झाली.

‘गगन सदन तेजोमय’ हे वसंत बापट यांचे गीत गायिका श्रुती जोशी यांनी सादर करत मैफलीचा श्रीगणेशा केला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचा महिला विभाग आणि स्वरसाज एंटरटेन्मेंटतर्फे प्रथमच दिवाळीनिमित्त शालिमार येथील आयएमए सभागृहात सुश्राव्य गीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वर आले दुरुनी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘पाहिले न मी तुला’, ‘दिस चार झाले मन’ अशी सदाबहार गीते नचिकेत देसाई व सई जोशी यांनी सादर केली. त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. गीतकार वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, सुरेश भट, सुधीर मोघे, शांता शेळके, राजा बढे, ग. दि. माडगूळकर, ना. धों. महानोर, सौमित्र, गुरू ठाकूर अशा एकेका गीतकारांच्या रचना घेत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘कळीदार कपुरी पान’ ही राजा बढे यांची रचना सादर होण्यापूर्वी अप्रतिम ढोलकीवादन करणार्‍या सिद्धार्थ कदम यांनाही रसिकांची दाद मिळाली. यावेळी अक्षय कावळे, प्रणव हरिदास, सौरभ शिर्के, सिद्धार्थ कदम या वादकांनी स्वरसाज चढविला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘जयोस्तुते जयोस्तुते’ या रचनेने सांगता झाली. यावेळी डॉ. प्रशांत देवरे यांचा सत्कार करण्यात आला. ‘आयएमए’च्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, डॉ. शलाका बागूल, डॉ. प्रेरणा शिंदे, सचिव डॉ. विशाल पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

इंदिरानगरलाही ‘साद स्वरांची’मध्ये रसिक मंत्रमुग्ध…

इंदिरानगरमधील सिटी गार्डनसमोरील परिसरात रविवारी (दि. 23) स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच अभ्यासिकेच्या सहकार्याने अमोल पाळेकर प्रस्तुत ‘साद स्वरांची’ मैफल पार पडली. विविध स्पर्धांमधील गायक आणि वाद्यवृंदाच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी केले होते. ‘बाप्पा मोरया’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. ‘माझी रेणुका माउली’, ‘अनादी निर्गुण’, ‘दार उघड बये’, ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’, ‘मल्हारवारी’, ‘खंडेरायाच्या लग्नाला’ आदी भक्तिगीतांनी या मैफलीत रंग भरला. प्रेमगीतांमध्ये ‘अधीर मन झाले’, ‘ग साजणे, आली ठुमकत’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ आदी सादर झाली, तर ‘प्रीतीच्या झुल्यात’ आणि ‘चंद्रा’ या गाण्यांवर चैताली पानसरे यांनी नृत्य सादर केले. ‘साद स्वरांची’ या मैफलीत अमोल पाळेकर तसेच विविध स्पर्धांतील विजेते गायक गौरी गोसावी, चैतन्य कुलकर्णी व चैताली पानसरे, चैतन्य लोखंडे, अनुजा देवरे आणि विजय जाधव यांनी आपली पेशकश सादर केली. या वाद्यवृंदांना स्नेहा रत्नपारखी, समीर शेख, अ‍ॅनेश आढाव, अभिजित शर्मा, देवानंद पाटील, विजय जाधव, मानसी पाटील आणि अदिती मोरे यांची साथसंगत लाभली.

हेही वाचा :

The post संगीत मैफल : स्वराभिषेकात नाशिककर चिंब appeared first on पुढारी.