सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर

ओझर : पुढारी वृत्तसेवा- मोदी गॅरंटीला प्रतिउत्तर म्हणून काँगेसने राहुल गांधीं यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या असून, यात केंद्रात सतेत्त आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ओझर येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी केवळ गॅरंटी नाही, तर राहुल गांधींची वॉरंटी या पाच मुद्द्यांना राहणार असल्याचे सांगितले.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिक येथे रवाना होण्यापूर्वी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ओझर येथे पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

यावेळी बोलताना जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदींनी २७ सप्टेंबर २०२० रोजी लागू केलेल्या कायद्यानंतर शेतकऱ्यांनी १५ महिने संघर्ष केला. या संघर्षादरम्यान तब्बल सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हे कायदे मागे घेतल्याची नामुष्की सरकारवर आली आणि योगायोग म्हणजे याच दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वाढदिवस होता. हे पंतप्रधान मोदींना कदाचित माहीत नसल्याने त्यांनी हा दिवस निवडला. माहीत असते तर त्यांनी श्रेयवादासाठी तारीख पुढे ढकलली असती. तर बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींनी दिलेली वॉरंटी ही सर्वसामान्य लोकांना विश्वास देणारी गॅरंटी असून, यूपीएच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता सुखी होती, असे सांगितले.

पत्रकार परिषदेस विश्वजित कदम, माजी मंत्री शोभा बछाव, डॉ. अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, अनिल कदम, हेमलता पाटील, हेमंत जाधव, सुनील बाफना आदी उपस्थित होते.

काय आहेत पाच गॅरंटी

1) एमएसपी कायदा लागू करणार

2) स्वामीनाथन आयोग लागू करणार

3) आयात-निर्यातबंदी धोरणाबाबत शेतकऱ्यांशी चर्चेनंतरच ठरवणार

4) पंतप्रधान फसल बिमा योजना लागू करणार

5) शेतकऱ्यांच्या शेती सलग्न यंत्रसामग्री, खते, अवजारांवर जीएसटी माफ करणार

The post सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर appeared first on पुढारी.