समाजप्रबोधनात कीर्तनाचे योगदान : मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे

नितीन ठाकरे www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे मोठे योगदान आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक प्रबोधनाचे कार्यक्रम होऊन समाजात जनजागृती झाली आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

मविप्रच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित प्रबोधनपर लोकजागर कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभा भागवत बोरस्ते, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील आहिरे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, प्रा. विजय जाधव आदी उपस्थित होते. ॲड. ठाकरे म्हणाले की, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर रावसाहेब थोरात आदी समाजधुरिणांनी सत्यशोधक जलसा यासारख्या लोककलेच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करून मविप्र सारख्या शिक्षण संस्थेची उभारणी केली. मनोरंजनाच्या माध्यमातून कीर्तनासारखी लोककला समाजाला पुढे घेऊन जाण्याचे कार्य करीत आहे. यावेळी सौरभ महाराज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील सादर केलेल्या लोककलांचा गौरव केला. विद्यार्थी पारंपरिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान नाकारून समाजात प्रकाश पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आयुष्यात खूप मोठे व्हा. परंतु मोठे केलेल्या गुरुजनांच्या ऋणात राहायला विसरू नका, असे प्रतिपादन सौरभ महाराज जाधव यांनी कीर्तनातून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना भजनी मंडळी म्हणून उभे केले. त्यात शुभांगी ढोमसे, सोपान खैरनार, अक्षय वाघ, गणेश थेटे, कन्हैया शिंदे, वेदांत होळकर, कृष्णा बस्ते, अरुण मोगरे, खंडेराव मोगरे, तुषार गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, चेतन पाचोरकर टाळकरी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापाकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post समाजप्रबोधनात कीर्तनाचे योगदान : मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.