साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

साक्रीत दुष्काळ जाहीर करा,www.pudhari.news

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या हंगामात साक्री तालुक्यासह जिल्हाभरात किंबहुना संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने साक्री तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जावे, अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार परिषद संलग्न साक्री तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली. तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठविण्यात आले. तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले.

यात प्रामुख्याने दुष्काळात लागू होणा-या सर्व सवलती साक्री तालुक्यात लागू कराव्यात, दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई व पाणीटंचाई निवारणार्थ व्यवस्था करावी टंचाईचा आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. दुष्काळामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची मध्य हंगामातील प्रतिकुलता जाहिर करून विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिका-यांची बैठक घ्यावी आणी 25 टक्के अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. या अडचणीच्या प्रसंगी जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी शासन, प्रशासनाने खंबीरपणे उभे राहावे. तसेच शासनाने याआधी जाहीर केलेलं कांद्यावरील अनुदान देखिल वितरित करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी पत्रकार संघाचे मार्गदर्शक सुभाष काकुस्ते, अध्यक्ष विजय भोसले, कार्याध्यक्ष धनंजय सोनवणे, सरचिटणीस लक्ष्मीकांत सोनवणे, उपाध्यक्ष सागर काकुस्ते, प्रसिद्धीप्रमुख पी.झेड.कुवर, ज्येष्ठ सदस्य बी. एम.भामरे, सतीश पेंढारकर, योगेश हिरे यांच्यासोबतच शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे हे उपस्थित होते.

हेही वाचा :

The post साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी appeared first on पुढारी.