साडेतेरा कोटींचा निधी; पाइपलाइनमधून वीसपेक्षा अधिक गावांना फायदा होणार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ६ ब्रिटिशकालीन कालव्याचे बंद सिमेंट नलिकेत रूपांतर होणार असून, या कालव्याची वहनक्षमता वाढून सुमारे ९४० हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या कामास जलसंधारण महामंडळाने १३ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ब्रिटिश राजवटीत सिन्नर तालुक्यातील नाद्यांवर अनेक ठिकाणी लहान-लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली होती. यामुळे जे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. मात्र पुढील देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक कालवे ठप्प झाले, तर काहींची वहनक्षमता घटली. आमदार कोकाटे यांनी कालव्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी जलसंधारण विभागाकडून प्रस्ताव बनवून घेतले. नद्यांवरील ६ कालव्यांचे बंद सिमेंट नलिकेत रूपांतर करण्यासाठी १३ कोटी ५२ लाख ६ हजार रुपये इतका निधी जलसंधारण महामंडळाने (Water Conservation Corporation) नुकताच मंजूर केला आहे.

वडगाव-धोंडवीरनगर या कालव्याची लांबी ६ किमी असून, ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे पाणी वडगाव, आटकवडे, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, सिन्नर मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर आदी भागांत पोहोचणार असून, त्यातून सुमारे २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. लोणार नदी ते लोणारवाडी (निफाडी) या कालव्याची लांबी २ किमी असून, त्याच्या ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनची वहनक्षमता १३ क्यूसेक इतकी आहे. यातून लोणारवाडी व भाटवाडी येथील १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. सुमारे ३.५ किमी लांबीच्या कुंदेवाडी-मुसळगाव या कालव्यासाठीही ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, वहनक्षमता १५ क्यूसेक इतकी आहे. यातून कुंदेवाडी व मुसळगावच्या १५० हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.

मुसळगाव-दातली या ५ किमी व ९०० मिमी पाइपलाइन कालव्यातून १५ क्यूसेक क्षमतेने पाणी वाहणार असून, त्यातून मुसळगाव, दातली व खोपडी येथील ३०० हेक्टर ओलिताखाली येणार आहे. गगन बंधारा ते बोडके वस्ती सोनांबे या १.५ किमी कालव्याच्या पाइपलाइनचा व्यास ६०० मिमी असून, त्यातून १२ क्यूसेक क्षमतेने पाणी वाहणार आहे. त्याचा फायदा कोनांबे व सोनांबे येथील ९० हेक्टर क्षेत्राला होणार आहे. म्हाळुंगी नदी ते टेंभूरवाडी या १.५ किमी कालव्याची वहनक्षमता १२ क्यूसेक असून, त्यासाठी ६०० मिमी व्यासाची पाइपलाइन वापरली जाणार आहे. त्यातून टेंभूरवाडी येथील १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. बंदिस्त नलिकेचे काम पूर्ण होताच ६ कालव्यांच्या पाण्याने परिसरातील बंधारे पूरपाण्याने भरले जातील. त्यामुळे या भागातील भूजलपातळीही वाढणार आहे.

ब्रिटिशकालीन ६ कालव्यांची डागडुजी करून उपयोग ही बाब लक्षात आल्याने पुन्हा नख्याने है कालवे बंदिस्त करून त्यांना संजीवनी देणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे आणखी १५ ते २० योजनांचे सर्वेक्षण झाले असून, त्याही लवकरच मंजूर होतील – माणिकराव कोकाटे, आमदार

या गावांच्या शिवाराला फायदा
वडगाव, पॉडबीरनगर, आटकवडे, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, सिन्नर, मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर, कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, सोनांबे, कोनांचे, टेंभूरवाडी आदी गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या बंदिस्त कालव्यांमुळे शेतीला पुरेसे आवर्तन मिळेल. उपड्या कालव्यांमध्ये नागरिक कचरा टाकतात, त्यामुळे दुर्गंधी बाढते. आरोग्याची समस्या निर्माण होते कालवे बंदिस्त झाल्यानंतर सर्वच समस्या सुटतील. – जयश्री लोणारे, सरपंच.

The post साडेतेरा कोटींचा निधी; पाइपलाइनमधून वीसपेक्षा अधिक गावांना फायदा होणार appeared first on पुढारी.