सावकारी पाश, जीवन भकास

सावकारी पाश www.pudhari.news

नाशिक (एक शून्य शून्य) – गौरव अहिरे

वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेक जण इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खासगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेतात. मात्र, आपण व्याज भरतोय की मुद्दल याचा अंदाज येईपर्यंत कर्जदार चक्रवाढ व्याजाच्या विळख्यात पुरता फसलेला असतो. ही बाब समजेपर्यंत कर्जदारास सावकाराच्या वसुलीचा सामनाही करावा लागतो. लगेच फेडून टाकू या विचाराने घेतलेले कर्ज दहापटपर्यंत अधिक परतावा देऊन किंवा संपूर्ण आयुष्याची जमापुंजी घालवून किंवा जीव देऊनच या चक्रवाढ व्याजाच्या विळख्यातून कर्जदार मुक्त होत असल्याचे दिसते.

पाथर्डी फाटा परिसरात राहणार्‍या गौरव व नेहा जगताप या दाम्पत्याने कर्जाच्या विळख्यात अडकून व कर्जवसुलीला येणार्‍या व्यक्तीला घाबरून आत्महत्या केल्याचे समोर आले. तसेच पंचवटीतील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीने दोन वर्षांपूर्वी खासगी सावकाराकडून 10 टक्के व्याजदराने साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेतले. या दोन वर्षांत कर्जदाराने तीन लाख रुपये सावकारास दिले. मात्र, सावकाराने दोन वर्षांत साडेचार लाखांवर चक्रवाढ व्याजदराने सुमारे 27 लाख रुपयांची मागणी केली, तसेच कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग केला. या प्रकरणी सावकाराविरोधात गुन्हा दाखल आहे. या आधीही तारवालानगर येथील एका ट्रकचालकाने तीन खासगी सावकारांकडून पाच लाख 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी ते दरमहा सुमारे 52 हजार रुपयांचा हप्ता देत होते. मात्र, ट्रकचा अपघात झाल्याने हप्ता न देता आल्याने सावकारांनी ट्रक जप्त केला. त्यामुळे हवालदिल होऊन ट्रकचालकाने आत्महत्या केली होती. या प्रकारे शहरातील अनेकांनी कर्जापायी जीव दिला आहे किंवा आयुष्याची जमापुंजी कर्ज फेडवण्यातच घालवली आहे. आर्थिक आलेख चांगला नसल्यास किंवा कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास बँक, सहकारी संस्थांकडून कर्ज मिळण्यास अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे पर्याय म्हणून अनेक जण खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर पैसे देतानाच सावकार पहिला हप्ता काढून घेतात. त्यामुळे कर्जदारास पाहिजे असलेली रक्कमही पूर्ण मिळत नाही. त्याचप्रमाणे काही वेळेस कर्जाला हमी म्हणून कर्जदार त्याच्याकडील वाहन, सोन्याचे दागिने, किंवा मालमत्ता सावकाराकडे गहाण ठेवतो. गहाण ठेवलेली मालमत्ता कर्ज घेतलेल्या रकमेपेक्षा कैकपटीने जास्त असते. मात्र, चक्रवाढ व्याजदराने कर्जाची रक्कमही वाढत जाते आणि कर्ज न फेडल्यास नाईलाजास्तव कर्जदारास गहाण मालमत्तेवरील मालकी हक्क सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातून कर्जदार आर्थिक संकटात आणखी फसतो आणि नैराश्याच्या गर्तेतही अडकतो. काही खासगी सावकार 20 टक्के दरानेही कर्ज देतात. आजच्या इंटरनेट युगात सर्व विश्व मोबाइलमध्ये सामावलेले असून, त्यात जुगारही समाविष्ट आहे. तरुणाई या ऑनलाइन जुगाराच्या मोहात पडली असून, तेथे नशिब आजमावण्याच्या नादात तरुणाई खासगी सावकाराकडून 10 ते 20 टक्क्याने कर्ज घेत असते. रोलेट, रमी सारख्या जुगारांमध्ये पैसे कमवण्याच्या नादात तरुणाई कर्जाच्या विळख्यात फसते. अशा तरुणांना हेरण्यासाठी सावकारांकडे स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड होण्यासाठी सावकारांकडून अल्पबचत प्रतिनिधी नेमले जातात जे कर्जदाराकडून रोज ठरावीक रक्कम घेतात व ती सावकाराकडे जमा करतात. काही ठिकाणी काम करणारे कामगारवर्ग मालकाकडून व्याजाने पैसे घेतात. तसेच पगारातून पैसे काढून कर्ज फेडण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, मालकही पगारातून फक्त व्याज घेण्यावर भर देतो त्यामुळे वर्षानुवर्षे मुद्दल तशीच राहत असल्याने कामगारांना कर्जाच्या डोंगराखाली दबून राहावे लागते.

काही वेळा तर फक्त कर्ज फेडण्यासाठी काही तरुण काम करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जदारांच्या आर्थिक संकटाचा किंवा समस्येचा गैरफायदा खासगी सावकारांकडून घेतला जात असून, त्यांची आर्थिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक केली जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑनलाइन कर्ज देणार्‍यांचा सुळसुळाट झाला होता. गरजू लोकांना तातडीने कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जदार कंपन्या कर्जदाराकडील महत्त्वाचे कागदपत्रे व मोबाइलवरील ताबा मिळवत होते. त्यानंतर कर्जाची परतफेड न झाल्यास या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून कर्जदारास दमदाटी केली जात होती. तसेच कर्जदाराच्या मोबाइलमधील छायाचित्रांचा व संपर्क क्रमांकाचा गैरवापर करून कर्जदाराची सोशल मीडियावर बदनामी केली जात होती. त्यामुळे भीतीपोटी कर्जदार अवाच्या सव्वा दराने पैसे फेडून किंवा आत्महत्या करून मान सोडवत होता. त्यामुळे सरकारने अशा अ‍ॅपवर बंदी घातली आहे. डिजिटल कर्ज पुरवणार्‍या अ‍ॅपला वेसण घालण्यात आले आहे, मात्र पारंपरिक पद्धतीने कर्ज पुरवणार्‍या खासगी सावकारांवर तक्रारदारांअभावी अद्याप वेसण घालता आलेले नसल्याने अनेकजण चक्रवाढ व्याजाच्या विळख्यात फसत आहेत. अनेकदा कर्जदारास खासगी सावकाराकडील कर्ज घेऊन चूक केल्याचे लक्षात येते. त्यामुळे ते विरोध करत असल्यास सावकारही ‘आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो, तुम्हीच आमच्याकडे कर्जासाठी मागणी केली होती’ असे सांगून दमदाटी करतात. त्यामुळे कर्जदारास कर्ज फेडण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. अशावेळी तो एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतो आणि कर्जाच्या दबावाखाली फसतच जातो. काही घटनांमध्ये वसुलीसाठी येणार्‍यांकडून कर्जदाराच्या घरातील महिलांवर वाईट नजरही राहते. ते व्याजाऐवजी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचे बोलले जाते. मात्र, तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहोचत नसल्याने ॉखासगी सावकारांवर कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे दिसते. शासनातर्फे सावकारांवर वचक ठेवण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत, मात्र, या कायद्यांच्या चौकटीत सावकार तक्रारदारांअभावी फसत नसल्याचेही वास्तव नाकारता येत नाही.

हेही वाचा:

The post सावकारी पाश, जीवन भकास appeared first on पुढारी.