सिटीलिंकच्या वेगाला आता मर्यादा, शहरात कमाल ६० तर ग्रामीण भागात ‘इतकी’

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- चालकांच्या रॅश ड्रायव्हींगमुळे गेल्या काही महिन्यांपासून टीकेची धनी बनलेल्या सिटीलिंकच्या वेगाला आता मर्यादा घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सिटीलिंकच्या बसेससाठी शहरी भागात कमाल ६० किलोमीटर प्रतितास तर ग्रामीण भागाच्या दिशेने महामार्गावरून धावताना कमाल वेगमर्यादा ९० किलोमीटर प्रतितास अशी निर्धारीत करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे. (Citylink Nashik)

सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने शहर बससेवा महापालिकेच्या माध्यमातून चालविण्याची संकल्पना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’च्या माध्यमातून शहर बससेवा सुरू केली. सद्यस्थितीत ५६ मार्गांवर २४४ बसेसची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक शहराबरोबरच महापालिका हद्दीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेणा, सैय्यद पिप्री, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, सायखेडा या ग्रामीण भागातही सिटीलिंकची बससेवा पुरविण्यात येते. या ग्रामीण भागातून शहराकडे अनेक प्रवासी कामानिमित्त येतात. त्यामुळे सिटीलिंकला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, चालकांकडून रॅश ड्रायव्हिंग होत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सिंटीलिंकच्या वाहकांकडून नियमांचे पालन केले जात नसून, ओव्हरस्पीड गाड्या चालविल्या जात आहे. आता वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आल्याने अपघातांना आळा बसणार आहे. (Citylink Nashik)

सिटीलिंक बाबतच्या तक्रारी (Citylink Nashik)

* सिग्नल जम्पिंग करणे

* मर्यादेपेक्षा अधिक वेगाने बस चालविणे

* झेब्रा क्रॉसिंगचेही नियम न पाळणे

* स्पीडब्रेकरवर वेगाने बस चालविणे

* थांब्याऐवजी रस्त्यावरच बस थांबवणे

हेही वाचा :

The post सिटीलिंकच्या वेगाला आता मर्यादा, शहरात कमाल ६० तर ग्रामीण भागात 'इतकी' appeared first on पुढारी.