सुषमा अंधारे यांच्या सभेला मज्जाव केल्याने धुळ्यात शिवसैनिकांचे आंदोलन

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगांव पोलीसांकडून सभेस मज्जाव करण्यात आला. या घटनेचा धुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या शिवसेना पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगांव जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांच्या धरणगांव, पाचोरा, पारोळा, चोपडा या ठिकाणी सभा शांततेत पार पडल्या असतांना मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जळगांव पोलीसांच्यावतीने ऐन वेळेस त्यांना परवानगी नाकारण्यात येवून त्यांना जळगांव येथील एका हॉटेलात स्थानबध्द करण्यात आले. त्यांना सभेत भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला. तोच प्रकार धडाडीचे शिवसैनिक शरद कोळी यांच्याबाबत देखील जळगांव पोलीसांनी करुन त्यांना देखील जळगांव जिल्ह्यातून सभेत भाग घेण्यास परवानगी दिली नाही.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ज्या हॉटेलात वास्तव्यास होत्या. त्या हॉटेललाच पोलीसांनी घेराव टाकला. त्या बाहेर पडल्यावर त्यांच्या गाडी भोवती 500 च्या वर पोलीसांनी गराडा घातला. हा सर्व प्रकार निंदनीय असून सुषमा अंधारे या दहशतवादी असल्या प्रमाणे त्यांना पोलीस प्रशासनाने वागणुक दिली. संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार विरोधी पक्षाला आपले विचार मांडण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य असतांना जळगांव पोलीसांकडून होत असलेली अरेरावी, या दोघा नेत्यांच्या सभेवर बंदी घालण्याचा प्रकार राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नाही. अशी प्रतिक्रीया यावेळी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.

या संदर्भात शिवसेना महानगर च्या वतीने तीव्र शब्दांत निषेध केला असून व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आम्ही सहन करणार नाहीत, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आज शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक भरत मोरे, कैलास पाटील, तुषार भामरे, संदीप सूर्यवंशी, महादू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, छोटू माळी, सुनिल चौधरी,मुन्ना पठाण, हिमांशू परदेशी, विभाग प्रमुख कैलास मराठे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post सुषमा अंधारे यांच्या सभेला मज्जाव केल्याने धुळ्यात शिवसैनिकांचे आंदोलन appeared first on पुढारी.