हसण्यात जादू आगळीवेगळी, भाग पाडते विसरायला दुःखे सगळी!

दीपिका वाघ

नाशिक : माणूस मोबाईलमध्ये विनोदी व्हिडीओ बघताना मनमोकळं हसतो; पण शेजारी बसलेल्या ‘आपल्या’ माणसाशी संवाद साधत नाही. आज घराघरांतील ही सत्य परिस्थिती आहे. सतत पुढे जाण्याच्या घाईत, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करता करता माणूस मनमोकळेपणाने हसायला विसरला आहे.

सध्या स्पर्धात्मक जगात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, सीनियर सिटिझन सर्व वयोगटांतील लोक वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावाखाली आहेत. ध्येयामागे धावताना, स्पर्धेचा सामना करत, ईर्ष्येने प्रयत्न करताना दिसतात; पण ज्या नैसर्गिक गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत, त्या मागे पडताना दिसत आहेत. घरातील सदस्य जेव्हा एकत्र येतात, तेव्हा एकमेकांशी संवाद साधताना मोबाईलमध्ये डोकावत राहणे याची माणसाला सवय झाली आहे. कुणाचा मेसेज, स्टेटस् बघण्याची उत्सुकता जेवढी असते, तेवढी उत्सुकता आपल्या माणसाशी बोलताना नसते. हसणे, रडणे, आनंद, दु:ख, राग, उदास होणे या नैसर्गिक क्रिया आहेत. कोणतीही भावना कोणतीही क्रिया प्रमाणात असली की, चांगले असते. रडल्यावर जसे मोकळे, हलकेफुलके वाटते तसे, हसल्याने मन प्रफुल्लित राहते, चेहर्‍याचे स्नायू मोकळे होतात. त्यातून मनमोकळेपणाने हसणे, लहान-सहान गोष्टींमधून आनंद मिळविणे महत्त्वाचे आहे. हसण्याने मन प्रफुल्लित, मन प्रसन्न राहते. सकारात्मक दृष्टिकोन वागण्या-बोलण्यात मेन्टेन ठेवायचा असेल, तर हसणे खूप महत्त्वाचे आहे.

सायकोलॉजीच्या थिअरीनुसार, दोन परस्परविरोधी गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. तसेच, दोन परस्परविरोधी भावना एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळे हसल्याने नैसर्गिकरीत्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्याला आनंद वाटतो, त्यावेळी काही कारणास्तव मनात दु:ख, राग, ताणतणाव असेल, तर ताण आपोआप कमी व्हायला मदत होते. ताण कसा कमी करायचा हा उद्देश बाजूला ठेवून नेहमीच्या जगण्यात आनंद कसा वाढेल, हसणे कसे वाढेल त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींतून हसण्याचा मार्ग शोधत रााहिले पाहिजे.
डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ

The post हसण्यात जादू आगळीवेगळी, भाग पाडते विसरायला दुःखे सगळी! appeared first on पुढारी.