३ हजार विद्यार्थीनींची शैक्षणिक वाट सुकर, दारापुढे आली सायकल

सायकल वाटप www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शासनाच्या मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३ हजार ९३ विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात आले. त्याकरीता १ कोटी ५४ लाख ६५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. घराच्या दारापुढे सायकल आल्याने विद्यार्थीनींचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास अधिक सुखकर झाला.

राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनींकरीता मानवविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या तसेच घरापासून पाच किलोमीटरच्या परिघात शाळा व महाविद्यालय असलेल्या विद्यार्थींनींना सायकल वाटप केली जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने अनुदानित शाळांमधील विद्यार्थीनींकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायकल विकत घेण्याकरीता विद्यार्थीनींना ५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामध्ये पहिल्या टप्यात साडेतीन हजार रुपये थेट बँकखात्यावर वर्ग केले जातात. तसेच सायकल खरेदी केल्यानंतर उर्वरित दीड हजार रुपयांचा हप्ता विद्यार्थींनींच्या बँकखात्यामध्ये अदा केला जाताे.

जिल्ह्यात सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, कळवण, दिंडाेरी, सटाणा व नांदगाव या आठ तालूक्यात सदर योजना दरवर्षी राबविण्यात येत असते. चालूवर्षी आठ तालूक्यातील ३ हजार ९३ मुली या उपक्रमासाठी पात्र ठरल्या. सदर विद्यार्थींनाना सायकल विकत घेण्यासाठी मानवविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १ कोटी ५४ लाख ६५ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. त्या मध्ये त्र्यंबकेश्वरवगळता उर्वरित सातही तालूक्यांना प्रत्येकी २० लाखांचा निधी देण्यात आला. त्यातून प्रत्येक तालूक्यात ४०० विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वरसाठी १४ लाख ६५ हजारांच्या अनुदानातून २९३ विद्यार्थींना सायकल मिळाली. शासनाच्या या पुढाकारामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थीनींचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागला आहे.

विद्यार्थींना मासिक भत्ता

मानवविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कस्तुरबा गांधी बालिका शाळेमधील विद्यार्थींनीना दरमहा १ हजार ५०० रुपये निर्वाह भत्ता दिला जाताे. त्यामध्ये ९ वी व १० वीच्या शाळा बाह्य असलेल्या ११ ते १४ वयोगटामधील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या, अल्पसंख्यांक संवर्गामधील मुलींकरीता या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपूरी येथे प्रत्येकी एक शाळा असून त्यामधील विद्यार्थीनींच्या मासिक निर्वाह भत्याकरीता ५५ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

सात तालुक्यात बसेस

मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या तसेच घरापासून ५ किलोमीटरपेक्षा दुर शाळा असलेल्या विद्यार्थीनींना एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. जिल्ह्यात मानवविकासअंतर्गत असलेल्या ८ तालुक्यांसाठी प्रत्येकी ७ याप्रमाणे ५६ बसेस विद्यार्थीनींना ऊपलब्ध करुन देण्यात आल्या. शाळा-महाविद्यालयांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या बसेस चालविण्यात येतात.

हेही वाचा :

The post ३ हजार विद्यार्थीनींची शैक्षणिक वाट सुकर, दारापुढे आली सायकल appeared first on पुढारी.