Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले….

छगन भुजबळ, Chhagan Bhujbal

 अविनाश पाटील शिंदे

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

1980 च्या दशका सुमारास महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळ असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक छोट्या पक्ष व नेत्यांना राजकारणामध्ये कारकीर्द करण्यासाठी खूप वाव मिळालेला होता. त्या वेळेचे प्रमुख मानले जाणारे विरोधी पक्ष जनता दल, शेकाप यांची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना-भाजप हे पक्ष जोरदार प्रयत्न करीत होते. अनेक नवीन नेते या काळात विविध आंदोलने चळवळी यातून जनतेसमोर येत होते. याच काळामध्ये अनेक आक्रमक अश्या तरुण कार्यकर्त्यांची फळी राज्याच्या राजकारणामध्ये उभी राहत होती. यामध्ये शिवसेनेचा ढाण्या वाघ समजले जाणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आघाडीवर होते.

बालपणीच मुंबईच्या भायखळा भाजी मार्केट मध्ये भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करणारे छगन भुजबळ व्ही. जे. टी. आय कॉलेजला डिप्लोमा चे शिक्षण घेत होते. याच दरम्यान मुंबईत शिवसेना ही आपली पाळेमुळे घट्ट रोवत आपले अस्तित्व प्रामुख्याने जनतेच्या नजरेत दाखवत होती. मराठी माणूस म्हणून भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमागे गेले अन् शिवसैनिक झाले.

कर्नाटकच्या जेलमधून बाहेर आल्यावर चर्चेत

शिवसेना महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न सुरु होते. तेव्हा त्यांच्याबरोबर छगन भुजबळ देखील सावलीप्रमाणे कायम असायचे. बेळगाव-कारवारच्या आंदोलनात भुजबळांनी बेळगावमध्ये वेश बदलून प्रवेश केलेला प्रवेश प्रचंड गाजला. त्यांना तिथल्या पोलिसांनी मारहाण देखील केली, जवळपास दिड महिने ते कर्नाटकाच्या जेलमध्ये होते. भुजबळ तिथून बाहेर आले आणि राज्यात चर्चेत आले. त्यांच्या या बेधडक कामगिरीमुळे शिवसेनेची आणि त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात व सीमावर्ती भागामध्ये प्रचंड वाढली होती.

मुंबईचे महापौर, माझगावमधून आमदार…..

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या धडाकेबाज कार्यप्रणालीमुळे त्यांचे वर्चस्व शिवसेनेत वाढले. इ.स.१९७३ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. ७३ ते ८४ या दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. मुंबई महानगरपालिकेवर १९८५ च्या दरम्यान पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली आणि भुजबळ मुंबई महानगरपालिकेचे महापौर करण्यात झाले . भुजबळ यांनी १९८५ व १९९० अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून येत आमदारकी मिळवली.

नव्वदीच्या दशकामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देशभर वातावरण फिरलेले होते. अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा, अशी आग्रही मागणी करत भाजपने देशभरात रथयात्रा क्जीत वातावरण केले होते. त्यात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला, त्यामुळे १९९० सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पहिल्यांदाच ५२ आमदार निवडून आले.

१८ आमदारांसह सेनेत बंड

शिवसेना सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला होता. विरोधी पक्ष नेता हे पद भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाच मिळेल असे चित्र असताना बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं. दुसरीकडे मंडल आयोग चे वातावरणात शिवसेनेची भूमिका पटत नसल्याने तसेच विरोधी पक्ष नेता म्हणून संधी न मिळाल्याने नाराज भुजबळांनी कॉंग्रेस च्या शरद पवर यांच्याबरोबर संपर्क वाढवला, ओबीसी आरक्षण बाबत पवारांचे विचार पटल्याने भुजबळांनी १८ आमदारांसह सेनेत बंड केले. शिवसेनेला मोठा हादरा या बंडामुळे बसला होता.

शिवसैनिकांचे जीवाचे रान आणि भुजबळांचा पराभव

त्यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) धडा शिकवण्यासाठी जीवाचे रान केले होतं. अनेकवेळा भुजबळ यांच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न झाले पण भुजबळ शिवसैनिकांच्या तावडीत सापडले नव्हते. त्यावेळी भुजबळांना सतत चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात आले होतं. याच काळात नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्रीपद भुजबळांनी भूषवले होते.

त्यानंतर १९९५ ची निवडणूक आली आणि भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेला माझगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला. या भागातून छगन भुजबळ दोनदा महापौर, आमदार, मंत्री अशी एक एक पायरी पार करीत यशाचे शिखर चढत राज्यातील दिग्गज ओबीसी नेते बनले होते. शिवसेना फोडल्यामुळे निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांच्या विरुद्ध बाळा नांदगावकर या नगरसेवकाला उमेदवारी दिली. बाळा नांदगावकर ३८ वर्षांचे तरुण नेते होते. महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत होते. भुजबळ यांच्या प्रमाणे तेही आक्रमक स्वभावामुळे आणि त्यांच्या कामांमुळे माझगाव मतदारसंघात लोकप्रिय होते. त्यामुळेच त्यांना भुजबळ यांचे विरुद्ध विधासभेसाठी मैदानात उतरवण्यात आले होते. माझगाव हा छगन भुजबळांचा पारंपरिक मतदारसंघ होता. १९८५ ला ते पहिल्यांदा याच मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर १९९० ला पण ते इथूनच ७ हजार मतांनी निवडून आले होते. पुढे कॉंग्रेस मध्ये गेल्यावर मंत्री झाले होते. त्यामुळे बाळा नांदगावकर यांच्यापुढे मोठे आव्हान होते, अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत जेव्हा निकाल लागाला तेव्हा मात्र तरुण तडफदार बाळा नांदगावकर विजेता ठरले होते. बाळा नांदगावकर हे तब्बल १२ हजार २७५ मतांनी निवडून आले होते. त्यांना तब्बल ४१ हजार ७२९ मत मिळाली होती. तर काँग्रेसकडून उभ्या असलेल्या भुजबळांना २९ हजार ४५४ मत मिळाली होती.

शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीत

काहीही करून भुजबळांना १९९५ च्या निवडणुकीत घरी बसवायचे असा पण शिवसैनिकांनी केला होता तो यशस्वी झाला होता. मात्र पवारांनी भुजबळ यांचावरील विश्वास म्हणून त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद भुजबळ यांना देण्यात आले. त्यानंतर १९९९ साली सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांची साथ करीत छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्य ते होते, त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि राष्ट्रवादी कडून भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.

गृहमंत्री पदाचा द्यावा लागला राजीनामा

यावेळी अब्दुल करीम तेलगीचा कोट्यवधींचा मुद्रांक घोटाळा पुढे आला. या प्रकरणात भुजबळांवर संशयाची सुई फिरू लागली, गृह खात्याचे अनेक अधिकारी यात गुंतल्याचे पुढे येऊ लागले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे नाव या प्रकरणात उघड घेतले गेले. आरोप प्रत्यारोप होऊ लागले. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी झाल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले होते. मुंबई दंगल प्रकरणी दाखल असलेल्या एका प्रकरणात खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना अटक करण्याचे भुजबळ यांच्याकडे असलेल्या गृह खात्याने ठरवले होते , तेव्हा मुंबईसह राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

भुजबळांची येवल्यात एंट्री….

तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्यामुळे भुजबळ एकाकी पडले होते, दोनदा विधानपरिषद सदस्य होते पण भुजबळांना विधानसभा गाजवायची असल्याने त्यांनी सुरक्षित मतदार संघ शोधणे सुरु केले. जुन्नर व येवला मतदारसंघ त्यांच्यापुढे पर्याय ठरले. त्याच दरम्यान येवला मतदार संघामध्ये वातावरण बदलत होते. वर्षानुवर्ष कॉंग्रेस विचाराचे आमदार असूनही दुष्काळी असलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागासलेला होता. येवला लासलगाव मतदारसंघात १९९५ व १९९९ साली शिवसेनेचे लासलगाव भागातील कल्याणराव पाटील आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत होते. येवला तालुक्यातील स्थानिक असलेल्या ४ नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याने लासलगावच्या कल्याणराव पाटील पाटील यांनी सलग दोनदा बाजी मारली होती. या मतदारसंघामध्ये सलग तिसऱ्यांदा कुणीच निवडून आलेले नसल्याने २००४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये असलेले स्थानिक नेते अंबादास बनकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे प्राबल्य मतदारसंघामध्ये होते, परंतु १९९९ साली शिवसेनेचे कल्याणराव हे त्यावेळी कॉंग्रेसच्या नरेंद्र दराडे यांच्या विरुध्द फक्त २२१ मतांनी निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसचे दराडे हे जोमाने २००४ च्या तयारीत होते. त्यात २००४ साली राष्ट्रवादीच्या औरंगाबाद येथील मेळाव्यात माणिकराव शिंदे यांनी येवल्यातील प्रसिद्ध अश्या पारंपारिक हलकडी या वाद्याचा गजर करीत येवला मतदार संघामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना संधी द्या अशी जाहीर मागणी केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये / येवला मतदार संघ हा कॉंग्रेसच्या वाट्याला होता तो राष्ट्रवादीकडे घेत भुजबळांनी येवला मतदार संघात उमेदवारी केली.

येवल्यातून पहिल्यांदा आमदार

भुजबळांच्या विरुद्ध त्यावेळचे आमदार कल्याणराव पाटील शिवसेनेकडून उभे होते, भुजबळ यांचे बरोबर माणिकराव शिंदे हे होते. शिंदे यांनी तालुक्यातील माजी आमदार मारोतराव पवार व भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीला जागा गेल्यामुळे नाराज नरेंद्र दराडे यांना भुजबळ यांच्या बरोबर आणले. भुजबळ यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांच्या समवेत तेव्हा फक्त अंबादास बनकर होते. राज्यातील प्रबल नेते आपले प्रतिनिधित्व करणार म्हणून येवला मतदार संघातील जनतेने भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी केले. त्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार २००४ ला आल्याने भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले. त्यावेळी शिवसेने भुजबळ यांच्या पराभवासाठी खूप प्रयत्न केले मात्र वजनदार बाहुबली नेता म्हणून जनतेने भुजबळ यांना मत रुपी संजीविनी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.

२००४ च्या येवल्यातील विजयाने भुजबळ यांची राज्यातील राजकीय वाटचाल वेगाने वाढली. प्रथमच ग्रामीण समस्या असलेल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतांना अनेक रखडलेले कामे मार्गी लावली. भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे येवला मतदार संघ राज्यासह देशात चर्चेत आलेला होता. त्यावेळी भुजबळ यांचे बरोबर असलेले , प्रामुख्याने भुजबळ यांच्या येवल्यातील उमेदवारीसाठी जीवाचे रान करणारे माणिकराव शिंदे भुजबळ यांच्यापासून दुरावले गेले तर दुसरीकडे सेनेत असलेले अंबादास बनकर भुजबळ यांच्या बरोबर गेले.

2009 मध्ये पुन्हा आमदार

२००९ मध्ये भुजबळ यांच्या विरुद्ध माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली. मात्र भुजबळ यांच्यामुळे मतदार संघातील बदल पाहून जनतेने पुन्हा भुजबळ यांनाच संधी दिली. या वेळी भुजबळ यांच्या बरोबर तालुक्यातील मारोतराव पवार, अंबादास बनकर, नरेंद्र दराडे हे तिन्ही नेते होते . त्यानंतर काही दिवसातच शिंदे हे सुद्धा पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीत सामील झाले. तर काही दिवसातच माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे संभाजी पवार यांचे भुजबळ यांच्याशी मतभेद झाल्याने शिवसेनेकडे गेले.

येवल्यात हॅट्रिक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी पवार यांनी भुजबळ यांच्याविरुद्ध लढत दिली. परंतु येवल्यातील जनतेने तिसऱ्यांदा भुजबळ यांना संधी दिली. भुजबळ निवडून आले. यावेळी भुजबळ यांच्या बरोबर माणिकराव शिंदे व बनकर, दराडे हे तिघे होते.

मात्र २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांचे वाईट दिवस सुरु झाले. पवार यांच्या नंतर नरेंद्र दराडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मार्च २०१६ मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून भुजबळ यांची इडी चौकशी करून त्यांना अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही. या काळात भुजबळ यांच्या बरोबर माणिकराव शिंदे खंबीरपणे साथीला होते. भुजबळ यांना जो पर्यंत जामीन होत नाही तो पर्यंत माणिकराव शिंदे यांनी फेटा, शाल व सत्कार स्वीकारणे बंद ठेवले होते तर अनेकांनी चप्पल घालणे सोडून दाढी वाढवणे असे स्वीकारले होते. पुढे दोन अडीच वर्षांनी भुजबळ बाहेर आले , यावेळी माणिकराव शिंदे यांनी मराठा मोर्चा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. भुजबळ यांनी आपल्याला विधान परिषदेचे प्रतिनिधित्व नाशिक स्थानिक स्वराज मधून दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही असे जाहीर करून शिंदे यांनी भुजबळ यांची साथ सोडली. याला कारणीभूत येवला नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कडून उभ्या असलेल्या माणिकराव शिंदे यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना नगराध्यक्ष निवडणुकीत भुजबळ समर्थक यांनी पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळेही शिंदे विरोधात गेले अशी चर्चा होती.

अन् भुजबळ येवल्यातून चौथ्यांदा आमदार झाले….

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांचे विरुद्ध पुन्हा सेनेकडून उमेदवारी करणाऱ्या संभाजी पवार यांना साथ दिली. सोबत दराडे हे सुद्धा भुजबळ यांच्याविरोधात पवार यांच्या बरोबर होते. मात्र या निवडणुकीत भुजबळ यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला.

The post Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले.... appeared first on पुढारी.