Chhagan Bhujbal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. माध्यमांनी केवळ एक बाजू सांगितली तशी दुसरी बाजू पण सांगायला हवी, कुठेही असलो तरी छत्रपती, फुले, शाहू आंबेडकरांबद्दल भूमिका कायम राहील, याबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

यावेळी भुजबळ म्हणाले की, मविप्र समाज दिनाच्या कार्यक्रमात ज्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडे फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात ते आमचे देव आहे, त्यांची पूजा केली पाहिजे, असे मी बोललो. मी हे आजच बोलतोय असा काही भाग नाही. वेळोवेळी त्याबद्दल मी बोललो आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असं काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. भिडे यांनी वाडा दिल्यामुळे पुण्यात पहिली शाळा सुरू झाली. यासाठी ब्राह्मण समाजातील चिपळूणकर,आगरकर आदी समाजसुधारकांनी फुले दाम्पत्याला साथ दिली आहे. आमच्या घरात सगळे देव आहे. कुणाच्याही भावना आपण दुखावलेल्या नाही. ज्या महापुरुषांनी आपल्याला शिक्षण दिले त्यांचे पूजन करायला हवे अशी भूमिका आपण मांडली आणि ती कायम राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. फुले दाम्पत्यासोबतच भारतरत्न सर विश्वेश्वरैया, जे. आर. डी. टाटा, सॉक्रेटिस, डॉक्टर श्रॉफ आदी मान्यवरांचे पुतळे आम्ही बसवल्याचे त्यांनी सांगितले. तर एम. एस. गोसावी यांचे तैलचित्र बसवण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही कुठल्या समाजाविरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कांदा अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी मंजूर झाला असून, हळूहळू सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्यातशुल्क, निर्यातबंदी यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्याशी बोलून केंद्रात काही चर्चा करता येते का याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भिडेंनी स्वत:चे खरे नाव स्पष्ट करावे

संभाजी भिडे यांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांना संभाजी नाव घेण्याची आवश्यकता का भासली ? असा सवाल उपस्थित करत हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं, हे योग्य नाही. महापुरुषांबद्दल वाईट बोलणं आणि अंधश्रद्धा या विचारांना आम्ही विरोध करणारच. महात्मा गांधी, फुले यांच्याबद्दल बोलतात, अगोदर त्यांनी स्वतःचे नाव स्पष्ट करावे, अशी टीका त्यांनी यावेळी भिडेंवर केली.

The post Chhagan Bhujbal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय appeared first on पुढारी.