Child Trafficking Case : ‘त्या’ चौघा मौलानांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कोठडी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधून 59 मुलांना सांगली आणि पिंपरी-चिंचवडच्या मदरशात घेऊन जाणाऱ्या आणि बालकांच्या तस्करीच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या चौघा मौलाना शिक्षकांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना मनमाड न्यायालयाने सोमवारी (दि.१२) न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीनंतर आरोपींच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला असता तो नामंजूर केल्याने या चौघांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

बिहार येथून 8 ते 18 वर्ष वयोगटातील 59 मुले आणि 4 शिक्षक (मौलाना) दानापूर एक्स्प्रेसने सांगली आणि पिंपरीला जात असताना बालकांच्या तस्करीच्या संशयावरून एका प्रवाशाने ट्विट करत रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या सहाय्याने भुसावळला 30 आणि मनमाडला 29 मुलांना ताब्यात घेऊन त्यांना रेल्वे पोलिसांच्या हवाली केले होते. रेल्वे पोलिसांनी मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली तर त्या चौघा शिक्षकांना न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. तपासासाठी रेल्वे पोलिस अधिकारी बिहारला गेले असता या मुलांची तस्करी करण्यात आली नसल्याचे उघड झाले. आम्ही मुलांना आमच्या मर्जीने चार मौलानांसोबत पाठविले होते, असे या मुलांच्या पालकांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे.

अटक करण्यात आलेल्या शिक्षक मौलानाची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्यांना मनमाड न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने कोठडी दिल्यामुळे या संशयित आरोपींचा जामीन मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी मालेगाव सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आल्याचे त्यांचे वकील ॲड. नियाज अहेमद लोधी यांनी सांगितले. 

हेही वाचा :

The post Child Trafficking Case : 'त्या' चौघा मौलानांची न्यायालयीन कोठडीत रवानगी appeared first on पुढारी.