नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्व सोयीसुविधांयुक्त, आरामदायी, किफायतशीर सेवेमुळे अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उरलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ शहर बससेवेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या राष्टीय स्तरावरील संस्थेतर्फे रोड सेफ्टी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
नाशिककरांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात अद्ययावत, सर्व सोयीसुविधांयुक्त, आरामदायी आणि तो ही खिशाला परवडणार्या दरात प्रवास करता यावा यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक कंपनीची स्थापना करण्यात आली. ८ जुलै २०२१ पासून सिटीलिंकच्या बससेवेला टप्प्याटप्प्याने प्रारंभ करण्यात आला. सद्यस्थितीत तपोवन, नाशिकरोड डेपो च्या माध्यमातून शहरात २५० बसेस चालविल्या जातात. महापालिका हद्दीलगतच्या २० किलोमीटर पर्यंतच्या ग्रामीण भागातही सिटीलिंकची बससेवा सुरू आहे. सिटीलिंकच्या माध्यमातून व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, दिव्यांग यांना दिल्या जाणाऱ्या बस प्रवासातील विशेष सवलतीमुळे नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिककरांनी सिटीलिंकवर टाकलेला विश्वास आणि तो टिकवण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाची कर्तव्यतत्परता याचाच परिपाक म्हणजे सिटीलिंकला मिळत असलेला हा रोड सेफ्टी पुरस्कार होय. यापूर्वी देखील २९ ऑक्टो रोजी नाशिक महापालिकेला सुषमा स्वराज भवन, दिल्ली याठिकाणी शहरी परिवहन संस्था, गृहनिर्माण वा शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणार्या १४ व्या अर्बन मोबिलिटी अवॉर्ड कार्यक्रमात ‘एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट २०२१’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सिटीलिंकला मिळालेला हा ‘रोड सेफ्टी’ पुरस्कार म्हणजे नाशिकच्या दृष्टीने एक गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे. हा केवळ पुरस्कार नसून, लाखो नाशिककरांचा सिटीलिंकप्रती असलेला विश्वास आहे. आणि हाच विश्वास कायम टिकविण्यासाठी सिटीलिंक कायम प्रयत्नशील राहील. – प्रदीप चौधरी, सीईओ, सिटीलिंक.
The post Citilinc Nashik : १५ मार्चला दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा appeared first on पुढारी.