Dhule Crime : साक्री तालुक्यातून शेती अवजारांची चोरी करणारी टोळी गजाआड

साक्री क्राईम

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातून शेती अवजारांची चोरी करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीविरोधात साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दहा गुन्हे केल्याची बाब देखील उघडकीस आली आहे.

साक्री तालुक्यात शेती अवजारांची चोरी करणारे टोळी कार्यरत होती. वेगवेगळ्या भागांमधून या टोळक्याने शेती अवजारांची चोरी करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवापूर तालुक्यातील लहान चिंचपाडा येथील सोनियेल दामजी वसावा उर्फ समवेल दामू गावित उर्फ टकल्या आणि विपिन वसंत मावची या दोघांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी नवापूर तालुक्यातील सुरेश उर्फ सूर्य रमेश गावित, कैलास उर्फ बाबा ईशरया वसावे, किशोर दिवजा गावित, प्रभू होड्या गावीत, अनिल लंगड्या, योहान  गावित, दिलीप रेवत्या गावित, अनिल रामसिंग गावित यांच्या मदतीने निजामपूर परिसरातून देखील शेती अवजारे चोरी केल्याची कबुली दिली.

या टोळक्याच्या ताब्यातून 35 हजार रुपये किमतीचे रोटावेटर आणि तीस हजार रुपये किमतीचे लोखंडी नांगर जप्त करण्यात आले आहे. या टोळक्याने साक्री, पिंपळनेर, निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोऱ्या केल्या असून या संदर्भात दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस पथकाने दिली आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : साक्री तालुक्यातून शेती अवजारांची चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.