Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

नंदूरबार www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

आपण लहान असताना वडिलांवर आलेल्या संकटाप्रसंगी आर्थिक मदतीला धावून आलेल्या हमाल-मापाडी बांधवांच्या त्या मदतीची परतफेड म्हणून तसेच वर्षानुवर्षे कष्ट करत ज्या बाजार समितीमध्ये आपले वडील झिजले, त्या मार्केट यार्डाबाबत कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांनी गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन संघटनेला वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयांचा धनादेश देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

श्रमिकांप्रति कृतज्ञता भाव जपून आदर्श निर्माण करणारे जगताप बंधू हे नंदुरबार शहरातील मनमोहननगर भागातील रहिवासी असून त्यांनी केलेली मदत हा विषय चर्चेचा झाला आहे. विशेष बाब म्हणजे किशोर जगताप आणि सुधीर जगताप यांचा खासगी वाहनाने विद्यार्थी ने-आण करणे हाच प्रमुख व्यवसाय आहे. मूळचे श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी स्व. साखरचंद शंकरराव जगताप हे नंदुरबारच्या मार्केट यार्डामध्ये हमालीतून उदरनिर्वाह करीत होते. 25-30 वर्षांपूर्वी मोठ्या आजारपणातून त्यांना जावे लागले आणि त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट आले होते. त्यावेळी पत्नी विठाबाई साखरचंद जगताप यांनी पतीच्या वैद्यकीय खर्चासाठी हमाल कामगार बांधवांकडे मदतीची याचना केली हाेती. सर्व हमाल बांधवांनी तत्परतेने मानवतेचा हात पुढे करून त्यांना आपापल्या परीने मदत केली होती. संघटितपणे केलेल्या त्या मदतीमुळे वैद्यकीय खर्च निभावला होता. त्यावेळी साखरचंद जगताप यांची किशोर आणि सुधीर हे दोन्ही मुले लहान होती. साखरचंद जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर कालौघात ही दोन्ही मुले परिश्रम करीत स्वतःच्या पायावर उभी राहिली.

तब्बल 25 वर्षांनंतर कै. साखरचंद जगताप यांचे दोन्ही पुत्र किशोर आणि सुधीर जगताप यांनी वडिलांप्रति कृतज्ञता जपत युनियनचे अध्यक्ष अशोक आरडे यांना भेटून कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी वडिलांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये देण्याची भावना व्यक्त केली. या अनोख्या निर्णयाने प्रथम अशोक आरडे आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या देणगीबद्दल कुठेही गाजावाजा न करण्याची इच्छादेखील जगताप बंधूंनी व्यक्त केली होती. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून उदार देणगीदात्यांचा यथोचित सन्मान करण्याचा मानस अशोक आरडे यांनी व्यक्त केला. स्व. साखरचंद जगताप यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 19) हमाल मापाडी भवनाच्या सभागृहात ज्येष्ठ कामगार भागवत भील, नवनाथ चौधरी, नामदेव शिंदे तसेच अशोक आरडे यांच्या हस्ते दोन्ही मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्व. साखरचंद जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व कामगार व हमाल बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही वडिलांच्या स्मरणार्थ कामगार व कष्टकरी बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी दोन लाख रुपयांची भरीव देणगी दिल्याबद्दल मार्केट यार्डसह समाजातील सर्व स्तरातून जगताप बंधूंचे कौतुक होत आहे. सत्कार सोहळ्यासाठी अशोक आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कदम, बाबूलाल पाटील, छोटू पाटील, अशोक सोपनार, योगेश शिंदे व सहकारी कामगारांनी परिश्रम घेतले.

वार्षिक वर्गणी उपक्रमाचा प्रारंभ

गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियनचे अध्यक्ष अशोक आरडे यांनी सांगितले की, मार्केट यार्डातील सहा कामगारांना वैद्यकीय खर्चासाठी 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यात दिनेश खांडेकर, मंगल वळवी, नारायण कदम, संजय चौधरी, कैलास कदम, हरी जगताप यांचा समावेश आहे. या वर्षापासून प्रत्येक कामगाराकडून वार्षिक 200 रुपये वर्गणी घेण्यात येऊन उपक्रम सुरू ठेवणार आहोत. आता जगताप बंधूंच्या भरघोस देणगीमुळे मोठ्या आजारासाठी कामगारांना आर्थिक मदत होणार आहे.

याचनेची वेळ येऊ नये

आमच्या कुटुंबावर आलेला वैद्यकीय मदतीबाबतचा प्रसंग कोणावरही येऊ नये. या भावनेतूनच वडिलांच्या स्मरणार्थ कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत देण्याचा छोटासा प्रयत्न केला. याबाबत इतरांनी प्रेरणा घ्यावी हाच उद्देश आहे, अशा शब्दांत याप्रसंगी किशोर आणि सुधीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

The post Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले appeared first on पुढारी.