Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर

ड्रोनद्वारे सर्वेक्षण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, देखावे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जयंती मिरवणुकीवर ड्राेन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासह मिरवणूक मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

शहरात सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून, विविध मंडळांनी जयंतीच्या मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी (दि.१४) दुपारी जुने नाशिक येथील राजवाडा परिसरातून मुख्य मिरवणूक चाैक मंडईमार्गे भद्रकाली, मेनराेडवरून रविवार कारंजामार्गे शालिमारकडे मार्गस्थ हाेणार आहे. उत्सवासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. मिरवणुकीवर ड्राेन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याची माहिती परिमंडळ एकचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

जुने नाशिक, नाशिकराेड व पाथर्डी येथे साजऱ्या हाेणाऱ्या जयंतीसाठी आयुक्तालयाचा तब्बल अडीच हजार पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात असेल. तसेच त्यांच्या जाेडीला स्थानिक पाेलिस ठाणे, गुन्हे शाखा युनिट १ व २, मध्यवर्ती गुन्हेशाखा, विशेष तसेच गाेपनीय शाखा, दरोडा, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी, खंडणी विरोधी पथक कार्यरत राहणार आहे. राज्य राखीव पाेलिस बल (एसआरपीएफ) च्या दाेन कंपनी, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), क्यूआरटी असे सर्व पथक तैनात राहणार आहेत. झाेन एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि झाेन दाेनचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी परिमंडळ एक व दोनसह गुन्हे शाखेच्या पथकांना त्यासंदर्भात बंदाेबस्ताचे आदेश दिले आहेत. मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनांना मनाई असेल.

फौजफाटा असा….

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपआयुक्त, आठ सहायक पोलिस आयुक्त, २०० पोलिस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षक असून, होमगार्डचे ३०० जवान व सुमारे दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.

हेही वाचा :

The post Dr. Ambedkar Jayanti : मिरवणुकीवर राहणार ड्रोनद्वारे नजर appeared first on पुढारी.