Narhari Zirwal : …तर घटनेवर शंका घेतली जाईल

नरहरी झिरवाळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सत्तासंघर्षात मी दिलेले पत्र आजही महत्त्वाचे आहे. जर माझ्याकडे हे प्रकरण आले तर मी योग्य पद्धतीने ते हाताळेल. तसेच मी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून घटनेचा आधार घेत अपात्र ठरवलेल्या आमदारांना पात्र ठरवले गेले तर माझ्यापेक्षा घटनेवर शंका उपस्थित केली जाईल, असे सूचक वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

सत्तासंघर्षात सरकार पडलं तर मुख्यमंत्री बदलेल. मग नवीन मुख्यमंत्री म्हणून मी का नको? स्वप्न बघायला काय हरकत आहे? असे म्हणत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मनीषा बोलून दाखविली. पुढे बोलताना, गेल्या आठवड्यात अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत बोलले तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे होर्डिंग्ज लागले. त्यामुळे आता तुमच्या आशीर्वादाने माझे पण लागले तर वावगे नको ठरायला, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सत्तासंघर्ष, शरद पवार यांचा निर्णय, अजित पवार यांबाबत चर्चा केली.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यामागे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मागणी तसेच राष्ट्रपातळीवरील नेत्यांनी केलेली विनंती महत्त्वाची होती. याव्यतिरिक्त जे काही बोललं जात आहे ते सर्व ज्याने त्याने सोयीनुसार काढलेला अर्थ आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं व्यर्थ आहे.

अजित पवार चालले याबाबत सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीने अर्थ काढले आहे. आम्ही सर्व गेलो तर अजित पवार जातील, मात्र तूर्तास आम्हाला कोणाला कुठेही जाण्यात रस नाही, त्यामुळे अजित पवार भाजपात जाण्याच्या शक्यता त्यांनी यावेळी खोडून काढल्या.

हेही वाचा :

The post Narhari Zirwal : ...तर घटनेवर शंका घेतली जाईल appeared first on पुढारी.