नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा
नाम फाऊंडेशनने चार खडकवासला होतील एवढे पाणी अडवले असून केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरात नामचे काम सुरू आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदिवासी भागात जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे जेथे विवंचना आहेत त्या समजावून घेण्यासाठी मी वारंवार येणार असल्याचे सांगत येथील परिसरात ज्याठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तलाव, बंधारे, धरण बांधण्यासाठी ‘नाम’ पुढाकार घेत पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याचा सर्वांच्या मदतीने प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकारातून नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिनेते नाना पाटेकर यांनी दिंडोरी, पेठ, सुरगाणा भागात पाणी प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दौरा केला. यावेळी झिरवाळ फाऊंडेशनतर्फे वनारे झिरवाळ यांचे वस्तीवर कृषी आदिवासी सेवक पुरस्कार व इतर मान्यवरांचा सन्मान सोहळा पाटेकर यांचे हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
नाम फाऊंडेशन तर्फे सुरू असलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील तीन बंधाऱ्यांची पाहणी पाटेकर यांनी केली. येथे 18 लाख लिटर पाण्याचे साठवण होणार आहे. पाटेकर यांनी राजकारणात झिरवाळ यांचे सारखी जमिनीशी नाळ टिकवून ठेवलेली चांगली माणसं आहेत असे सांगत, याप्रमाणेच जनतेसाठी कार्यरत रहा अशी कौतुकाची थाप दिली. शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेती करण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपले योगदान सामाजिक कार्यात द्या, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी या भागात भरपूर पाऊस पडूनही पाणी दुर्भिक्ष असते त्यासाठी बंधारे बांधण्याची गरज व्यक्त केली. त्यावर नाना यांनी प्रत्येकाने स्वतः पासून तयारी करा व प्रकल्पांचा जमीन उपलब्धतेचा प्रश्न सोडवा आमची नाम संघटना त्वरित आपणास मदत करेल असे आश्वासन दिले. वनारेचे सरपंच दीपक झिरवाळ, गोकुळ झिरवाळ यांनी नाना पाटेकर यांचे स्वागत केले. आदिवासी बचत गटाच्या विविध महिला सदस्यांनी ग्रामीण भागात बनविलेल्या भेटवस्तू नानांना देत त्यांचा सत्कार केला. नाना पाटेकर यांनी सर्व परस्कारर्थींचा सत्कार करत शाबासकी दिली.
यांचा झाला सन्मान
कृषी भूषण पुरस्कार विजेते सुरेश कळमकर, सम्राट राऊत, दामोदर सानप, पुनम डोखळे यांच्यासह एन डी ए मध्ये कॅप्टन म्हणून निवड झालेली शुभांगी चौधरी, धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैष्णवी परदेशी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त उद्धव मोरे, धोंडीराम थैल, रघुजी गवळी, ज्ञानेश्वर भोये, तनुजा चौधरी, साहित्य पुरस्कार प्राप्त उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, मूर्तिकार विष्णू पवार, उद्योजिका सुमित्रा जाधव, उद्योजक पुरुषोत्तम गायकवाड, गोपीनाथ पाटील, गायक मिथुन कोंढवले, मयूर चव्हाण , मनोहर भसरे, विठ्ठल संधान, जवळके दिंडोरी च्या आमची आदर्श शाळा पुरस्कार विजेच्या सरपंच भारती जोंधळे.
नानांनी जिंकली उपस्थितांची मने
तनुजा चौधरी या विद्यार्थिनीने शहीद सैनिकाची कहाणी सांगितली. तसेच आदिवासी सेवक पुरस्कार विजेते पुरस्कार्थींना व्यासपीठावर येणे शक्य नसल्याने त्यांना खुर्चीवर उचलून आणण्याचा प्रयत्न बघताच नाना यांनी स्वतः व्यासपीठावरून खाली उतरत त्यांचा सन्मान केला. त्यानंतर सर्वच पुरस्कार्थींची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या कुटुंबीयांना व्यासपीठावर बोलावून घेत त्यांचाही सन्मान केला.
नाम फाउंडेशन
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरू केलेली एक धर्मादाय संस्था असून संस्थेद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली जाते.
The post Nashik | 'नाम' दूर करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष- नाना पाटेकर appeared first on पुढारी.