Nashik : मोठा गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट अभियान सुरु केलं, आता रद्द करण्याची नामुष्की

सेल्फी विथ टॉयलेट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अतिशय गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट  हे अनोखे अभियान सुरू केले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती बघता तसेच विभागातील काही शिक्षक, अधिकारी यांनी केलेल्या विरोधामुळे हे अभियान रद्द करण्याची नामुष्की प्राथमिक शिक्षण विभागावर आल्याची बाब समोर आली आहे. त्या आशयाचे पत्र प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या स्वाक्षरीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने जिल्हयात शौचालय वापरण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून युनिसेफ आणि सीवायडीए पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छ शौचालय अभियान राबविण्यात येणार होते. यानिमित्ताने चौथी ते दहावीच्या मुला-मुलींसाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

निर्गमित केलेल्या शुद्धीपत्रात नमूद केल्यानुसार, जागतिक टॉयलेट दिनाचे औचित्य साधून युनिसेफ आणि सीवायडीए यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ शौचालय अभियान राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, ते पत्र रद्द करण्यात येऊन त्याऐवजी जागतिक शौचालय दिन स्पर्धा राबविण्यात यावी. त्यासाठी पथनाट्य आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

स्वच्छता रन पर्याय 

दरम्यान, राज्य शासनाने जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वच्छता रन आयोजित करण्याबाबत सूचना केल्या असल्याने ही जनजागृती रन करण्यात येणार आहे. त्यामुळे सेल्फी विथ टॉयलेटला स्वच्छता रन हा पर्याय निघाला असल्याची चर्चादेखील जिल्हा परिषदेच्या आवारात सुरु आहे. 

हेही वाचा :

The post Nashik : मोठा गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट अभियान सुरु केलं, आता रद्द करण्याची नामुष्की appeared first on पुढारी.