
लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात होळीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. एकतर कांद्यासह इतर शेतमालाला भाव नसताना सोमवारी (दि. 6) पहाटे 2.30 पासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली.
निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील रवि गायकवाड यांचा एक एकर गहू, विजय शिंदे यांचा दोन एकर गहू, नंदू मोरे यांचा एक एकर कांदा, मच्छिंद्र गायकवाड यांच्या दोन एकरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे.
लासलगाव शहरासह परिसरात पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष, कांदा, गहू, मका भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी शेतात काढून ठेवलेला तसेच बाजारपेठेत उघड्यावर ठेवलेला कांदा अचानक अवकाळी पाऊस आल्याने भिजला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली रब्बी पिके मातीमोल होण्याची भीती आहे.
लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचा उघड्यावर असलेला कांदा तसेच मका भिजल्याने नुकसान झाले आहे. यासोबतच पावसामुळे हरभरा, गहू व द्राक्ष या पिकांचेही मोठे नुकसान होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. बाजारपेठेमध्ये शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आधीच सुलतानी संकट आहे. अशात पावसाचे वातावरण नसताना अचानक पाऊस होऊन शेतकरी आता अस्मानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.
हेही वाचा :
- नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल
- RJD MP Misa Bharti : RJD खासदार मीसा भारतींच्या निवासस्थानी चौकशीसाठी सीबीआयची धडक
- पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात रात्री जोरदार पाऊस
The post Nashik : लासलगावला गहू झाला अडवा, कांदा भिजला; उरल्यासुरल्या आशा संपुष्टात appeared first on पुढारी.