Nashik : अवकाळीने द्राक्ष निर्यात आली निम्म्यावर

द्राक्ष निर्यात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यापासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निम्यापेक्षाही कमी द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे. यंदा राज्यातून ३०९९ कंटेनरमधून ४१ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मागील वर्षी ९ एप्रिल रोजी निर्यातीचे हेच प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजे ७८१८ कंटेनर (१ लाख ५ हजार ८२७ मेट्रिक टन) इतके होते. यंदा अवकाळीचा फटका बसल्याने निर्यात घटल्याचे दिसून येते आहे.

द्राक्षपंढरी असलेल्या नाशिकमधून मोठ्याप्रमाणात द्राक्षांची निर्यात होत असते. त्यातून देशाला परकीय चलन उपलब्ध होते. देशात कांदा आणि द्राक्ष निर्यातीसाठी नाशिक ओळखले जाते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी होत असली तरी त्याचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त आहे. राज्यातील ४६ हजार द्राक्षबागांपैकी एकट्या नाशिकमधून ३० हजाराहून अधिक बागांची नोंदणी झाली आहे. नोंदणी मागील वर्षीच्या तुलनेत समान स्तरावर असली तरी निर्यात मात्र निम्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षांचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे निर्यातीला अडचण येते आहे.

२०२० आणि २०२१ हे दोन्ही वर्ष कोरोनामुळे नियार्तदारांना अडचणीचे गेले. त्यानंतर २०२२ साली काही प्रमाणात द्राक्षनिर्यातीला चांगला वाव मिळाला. मात्र यंदा पुन्हा त्यावर अवकाळीची संक्रांत आल्याने निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अजूनही निर्यातीसाठी काही कालावधी शिल्लक आहे. त्या काळात निर्यात होण्याची शक्यता आहे.

द्राक्ष निर्यात झालेले प्रमूख देशकंटेनर

नेदरलॅण्ड २३०९

इंग्लंड जर्मनी २३४

डेन्मार्क ४१

लॅटव्हिया ३७

हेही वाचा :

The post Nashik : अवकाळीने द्राक्ष निर्यात आली निम्म्यावर appeared first on पुढारी.