Nashik : ओझरकर गारठले! राज्यात सर्वात निचांकी तापमानाची नोंद

थंडी,www.pudhari.news

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा 

यंदाच्या थंडीच्या मोसमातील सर्वाच्च निचांकी तापमानाची नोंद नाशिकच्या ओझर येथे झाली असून ओझर मध्ये ४.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे.  ओझरकर या कडाक्याच्या थंडीने गारठले आहेत.

गेल्या दोन तीन दिवसांपासून ओझर व परिसरात दुपारी गरमी तर रात्री थंडी असा वातावरणाचा खेळ सुरू होता. शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारपासून गार वारे वाहण्याच्या बरोबरच तापमानाचा आकडा देखील खाली जात होता. आज एच.ए.एल येथे पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रातील सर्वात निचांकी तापमान ४.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानाचा पारा घसरल्याने थंड वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरली असून दिवसा देखील हवेत गारवा निर्माण झाला होता.

ओझरमध्ये घसरलेल्या तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे. शहरातील काही भागात पुन्हा शेकोट्या तर सकाळच्या सत्रात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा पर्जन्यमान देखील लांबल्याने शेतकऱ्यांवर याचा थेट परिणाम होत खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. थंडीचा वाढलेला जोर हा रब्बीतील गहु, हरबरा या पिकांसाठी पोषक असला तरी द्राक्षबागांसाठी नुकसानकारक असून द्राक्षांच्या वेल आणि फळवाढीला याचा मोठा फटका बसत आहे. थंडी वाढल्याने द्राक्ष बागायतदार आपल्या बागेत शेकोटीने उब देत आहे.

हेही वाचा :

The post Nashik : ओझरकर गारठले! राज्यात सर्वात निचांकी तापमानाची नोंद appeared first on पुढारी.