Nashik : कृषी महोत्सवात ज्वारीची बिस्किटे, उखळात कुटलेला तांदूळ अन् बरच काही…

कृषी महोत्सव नाशिक,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

सेंद्रिय शेतीत पिकविलेला भाजीपाला, आदिवासी पट्टयातील रानभाज्या तसेच इगतपुरी, त्र्यंबक जिल्ह्यात पिकणारा तांदूळ या सर्व पदार्थांची मांदियाळी कृषी विभागाच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या पाचदिवसीय कृषी महोत्सवात दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे शेतकरी आणि महिला बचतगट यात सहभागी आहेत.

राज्य शासनाच्या सूचनांनुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यातील पहिला कृषी महोत्सव नाशिक येथील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर होत आहे. यामध्ये जवळपास दोनशे स्टॉल्सवर कृषी आणि त्यासंबंधित वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी आहे.

ऑरगॅनिक गूळ, ज्वारीची बिस्किटे, ज्वारीचा चिवडा, उखळात कुटलेला इंद्रायणी तांदूळ, नाचणी सत्त्व, गूळ पावडर अन् वेगवेगळा सेंद्रिय भाजीपाला अशा विविध वस्तू शेतकऱ्यांनी आणि महिला बचतगटांनी सादर केल्या आहेत.

दरम्यान, शेतकरी बचतगट, फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्या यांनी वेगवेगळ्या वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मक्याचे अधिकाधिक उत्पादन देणारे बी, लालकेळीचे रोप, चायनीज फ्लॉवर, कोबी, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या विविध भाज्या आणि फळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासोबतच कृषी उत्पादनाचे बी- बियाणे कंपन्या, ट्रॅक्टर, नांगरणी वखरणीसाठी लागणरे विविध अवजारे यांचेदेखील विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : कृषी महोत्सवात ज्वारीची बिस्किटे, उखळात कुटलेला तांदूळ अन् बरच काही... appeared first on पुढारी.