Nashik : त्र्यंबकेश्वरचे श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद

निवृत्तीनाथ महाराज मंदिर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ‘प्रसाद’ योजनेंतर्गत संत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामासाठी सध्याची इमारत उतरविण्याचे काम सुरू असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि. 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या काळात संस्थानातर्फे नित्यनैमित्तिक पूजाअर्चा सुरूच राहणार असल्याचे प्रशासक तथा सहायक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे, संजय जाधव, मुख्याधिकारी यांनी जाहीर केले आहे.

लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर जीर्णोद्धाराचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून, त्यावर सोन्याचा कळसदेखील बसविण्यात आला आहे. आता प्रसाद योजेनेतून 11 कोटींची विकासकामे येथे होत आहेत. त्यासाठी मंदिराच्या बाजूस असलेल्या इमारतीचे तोडकाम सुरू झाले आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यात सभामंडप, प्रदक्षिणा मंडप, भाविकांसाठी प्रतीक्षालय आणि सामानघर व पायखाना प्रस्तावित आहे. दर्शनबारीत चार दिशांना चार भव्य दरवाजे, सभामंडप पूर्ण दगडी बांधकामात व छातावर दगडी कोरीव कामाचे छत असा प्रकल्प साकारणार आहे. प्रामुख्याने भजन, कीर्तन यासाठी खुले अंगण आणि बसून विश्रांती घेण्यासाची व्यवस्था येथे केली जाणार आहे. दुकाने, भाविकांसाठी तीन मजली प्रतीक्षालय इमारत त्याचबरोबर मोकळ्या जागेत बांधकाम करून लँडस्केप पदपाथ आणि प्रकाश रोषणाईचीही सुविधा केली जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकेश्वरचे श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद appeared first on पुढारी.