Nashik : निवडणूक प्रचारावरुन आमदाराला धमकी ; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक,www.pudhari.news

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याचे समजते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी चिन्ह वाटप व याद्या जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना (शिंदे गट) असे चित्र असले तरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होणार आहे.

महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे देखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झालेले आहेत. निवडणूक प्रचारावरुन भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर चुंभळे यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे याने देखील आमदार खोसकर यांना धमकी दिल्याचे समजते.

याप्रकरणी., आमदार खोसकर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दरम्यान, या प्रकारामुळे नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

आदिवासी संघटना रस्त्यावर उतरणार

दरम्यान आदिवासी संघटनांनी याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला आहे. चुंभळे पिता-पुत्राला अटक व्हावी, या मागणीसाठी शनिवार (दि. २३) रोजी बऱ्याच संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत पिंगळे गट व खोसकर यांचे हितचिंतक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.

हेही वाचा : 

The post Nashik : निवडणूक प्रचारावरुन आमदाराला धमकी ; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.