Nashik: बेकायदा सोसायट्यांना रोखण्यात यश ; अनिल कदम यांची माहिती

आमदार अनिल कदम,www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी बेकायदेशीररीत्या नोंदविलेल्या सहा विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या ७८ सदस्यांचा निवडणुकीतील सहभाग अपात्र ठरविला आहे. सहकारमंत्र्यांच्या आदेशानुसार सहकार निबंधकांनी ही कारवाई केली. त्यामुळे आमचे मनोबल वाढल्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कदम म्हणाले की, आधीच्या तीन सोसायट्यांचे ३९ मतदार आणि हे 78 अशा एकूण ११७ मतदारांची नावे कमी केली आहेत. सहकारातील नियमावली धाब्यावर बसवून विद्यमान आमदारांनी सत्तेचा गैरवापर करून घाईघाईत बेकायदा सोसायट्यांचे अस्तित्व निर्माण केले होते. मात्र, संबंधित ठिकाणी आम्ही योग्य बाजू मांडत याबाबत न्याय मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच आता सर्व शक्तीनिशी पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरपंच भास्कर बनकर म्हणाले की, विद्यमान आमदारांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीत गत पाच वर्षे सत्ता असताना पोरखेळ करत शहराची वाट लावली. केवळ सत्तेचे केंद्रीकरण करून सर्व सत्ताकेंद्र स्वतःच्या घरात ठेवल्याने पिंपळगावकरांनी आमदार बनकर यांना धक्का देत सोसायटी, ग्रामपंचायत, जाॅइंट फार्मिंग येथील सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. गोकुळ गिते यांनीही निकालाचे स्वागत करत सहकारमंत्र्यांनी बेकायदा सोसायट्या रद्द करून चपराक दिल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ॲड. प्रतीक शिंदे यांनी उच्च न्यायालयात सक्षम बाजू मांडली. ॲड. रामेश्वर गिते, ॲड. नितीन गवारे, ज्येष्ठ विधीज्ञ सुरेल शाह यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पिंपळगाव सोसायटीचे संचालक दिलीप मोरे, खंडू बोडके, राजाभाऊ पाटील, दीपक शिरसाट, देवेंद्र काजळे, किरण निरभवणे, अमोल भालेराव, समीर जोशी, भाऊ घुमरे, श्यामराव शंखपाळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Nashik: बेकायदा सोसायट्यांना रोखण्यात यश ; अनिल कदम यांची माहिती appeared first on पुढारी.