Nashik : भूमाफियांच्या वक्रदृष्टीने त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य धोक्यात

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर

तालुक्यातील राखीव वनजमिनींकडे भूमाफियांची वक्रदृष्टी वळल्याने येथील निसर्गसौंदर्य धोक्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसराला नैसर्गिक साधनसंपत्तीची मुक्त हस्ते देणगी लाभलेली आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या निसर्गसौंदर्याचे आमिष दाखवित फार्म हाउस आणि रिसॉर्ट प्रकल्पांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक ब्रह्मगिरी आणि परिसरातील बहुतांश जमिनी आदिवासी बांधवांच्या आहेत. तेथे शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधव शेती करीत आहेत. वनसंपत्तीची जोपासना करत आहेत. गेल्या दोन दशकांत त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाळी पर्यटनास शहरी भागातील नागरिकांची पसंती मिळत आहे. पावसाळ्यात विशेषत: शनिवार-रविवारी वीकएंड सहलीसाठी हौशी पर्यटक गर्दी करीत आहेत. यामध्ये पहिने बारी, दुगारवाडी धबधबा, तोरंगण अथवा अंबोली घाट, हरिहर किल्ला, अंजनेरी गड, ब्रह्मगिरी यांसह धरणांचे परिसर पावसाळ्यात गजबजलेले दिसतात. पावसाळ्यात या भागास भेट दिलेल्या शहरी नागरिकाला हिरव्या पाचूंचे रान, शुभ्रधवल धबधबे, धुक्यात वेढलेले डोंगरकडे यांचे आकर्षण वाटते. याचा फायदा काही रिअल इस्टेट व्यावसायिकांनी घेतला आहे.

आदिवासी जमिनी बिगरआदिवासींना खरेदी करता येत नाहीत. कुळ असेल, तर ते स्वत: आपले अधिकार कमी करण्यासाठी अर्ज करू शकते. मात्र त्याच वेळेस त्या कुळाला दुसऱ्या सातबारावर अधिकार द्यावा लागतो. यासारख्या आदिवासी कुळाचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांना बगल देण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात भूमाफिया ओळखीच्या आदिवासी खातेदाराच्या नावे अशा जमिनी खरेदी करतात. कुळाचे अधिकार लिहून घेतात. जमीन बिगरशेती करण्यासाठी शेतीपूरक उद्योगासाठी प्रकरण तयार केले जाते. अटी-शर्तींच्या आधारे बिगरशेती झालेली जमीन बिगरआदिवासींच्या नावे खरेदी केली जाते. त्यानंतर तिच्यावर लेआउट टाकला जातो. एकर अथवा हेक्टरच्या दराने फुटकळ किंमत देऊन खरेदी केलेली जमीन नंतर गुंठ्याच्या अथवा वाराच्या दराने विकली जाते. यामध्ये मूळ आदिवासी मालक अथवा कुळ यांची फसवणूक झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

डोंगरदऱ्यांची जमीन असल्याने तिची तोडफोड करण्यात येते. सपाटीकरण करताना ब्लास्टिंग केले जाते. शेकडो वर्षांचे वृक्ष तोडले जातात. ओहोळ, नाले बुजवले जातात. प्रवाह दिशा बदलतात. पावसाळ्यात भराव वाहून येतात. त्यामुळे केवळ प्लॉटिंग झालेल्या जमिनींपुरता हा प्रश्न मर्यादित नसून, परिसरातील संपूर्ण परिसंस्था धोक्यात येत आहे. वन्यजिवांचा अधिवास उद्ध्वस्त होत आहे. दिवसेंदिवस विद्रुपीकरण करत तेथे सिमेंटचे जंगल उभे राहात आहे. शहराप्रमाणे वसाहती तयार होत आहेत. त्यामुळेच पहिने ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन याबाबत ठराव मांडण्यासाठी पाऊल उचलले आहे.

धबधबे, हिरवाई दाखवून फसवणूक

शहरी भागातील गुंतवणूकदार अनेकदा सेवानिवृत्त कर्मचारी असतो. त्र्यंबकेश्वर हे पावसाचे माहेरघर आहे. येथे पावसाळ्यात व्रिकमी पाऊस कोसळतो, मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठी घोटभर पाणी मिळेल की नाही, अशी परिस्थिती आहे. बेसाॅल्ट खडकाचा भूभाग असल्याने विंधन विहीर कूपनलिका येथे निकामी ठरल्या आहेत. अशा वेळेस पावसाळ्यातील चार महिन्यांतील आकर्षक चित्र पाहून फार्म हाउस घेतले जाते. प्लाॅट व्रिकी करणारे पावसाळ्यातील येथील धबधबे, हिरवाई, धुक्यातील डोंगर यांचे चित्र दाखवितात, मात्र उन्हाळ्यात रखरखीत निसर्ग पाहून येथे पाय ठेवण्यासदेखील धजावणार नाहीत, अशी अवस्था असते.

हेही वाचा :

The post Nashik : भूमाफियांच्या वक्रदृष्टीने त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य धोक्यात appeared first on पुढारी.