Nashik : मुंबई नाका वाहतूक बेटावर साकारणार फुलेंचा पूर्णाकृती पुतळा

मुंबई नाका नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाका या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रवेशव्दारावर असलेल्या वाहतूक बेटावर महापालिकेतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जाणार आहे. त्याकरता मनपाने अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली आहे. दरम्यान, पोलिस परवानगीशिवाय पुतळा उभारला जाऊ नये, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.

मुंबई नाका येथील संबंधित वाहतूक बेटावर मराठी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा पुतळा उभारण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाच्या नूतनीकरणामध्ये त्यांचा पुतळा साकारला जाणार असल्याने मुंबई नाका येथील पुतळा उभारणीचे काम रद्द करण्यात आले. त्यावेळी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा मुंबई नाका येथे उभारला जाणार आहे. त्या अनुषंगाने फुले दाम्पत्याचा पुतळा उभारण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रस्ताव सादर झाला असता त्यास मंजुरी देत पोलिसांची परवानगी घेण्याचे निर्देश शहर अभियंता नितीन वंजारी यांना दिले आहेत.

त्याचबरोबर पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्‍वारूढ व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला जाणार आहे. बी. डी. भालेकर हायस्कूलजवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, तर शिवाजी उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक साकारण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post Nashik : मुंबई नाका वाहतूक बेटावर साकारणार फुलेंचा पूर्णाकृती पुतळा appeared first on पुढारी.