Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत

उज्वल निकम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ज्या प्रकारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतेही बंधन नाही, तशीच अवस्था सध्याच्या राजकारणाची झाली आहे. राजकारणात शिव्या देण्याचे प्रमाण एवढे वाढले की, कोणतेही तारतम्य आता राहिले नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी राजकारणाची अवस्था झाल्याची खंत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी पुरस्कार वितरणाप्रसंगी महाकवी कालिदास कलामंदिरात ते बोलत होते. ॲड, निकम म्हणाले, केव्हिन कार्टरसारख्या पत्रकाराने दक्षिण आफ्रिकेच्या सुदानमध्ये दुष्काळ ठिकाणी भुकेली लहान मुलगी आणि तिच्या मरणाची वाट बघणारा गिधाड असा फोटो काढला. या फोटोसाठी कार्टरला अनेक नामांकित पुरस्कार मिळाले. परंतु एका पुरस्कारप्रसंगी कार्टरला एका श्रोत्याने विचारले, त्या मुलीचा फोटो काढल्यानंतर तू काय केले? कार्टर म्हणाला, माझी फ्लाइट असल्याने मी लगेचच निघालो. त्यावर श्रोता म्हणाला, एक गिधाड मुलीच्या मरणाची वाट बघत होता तर दुसरा फोटो काढणारा गिधाड होता. काही काळानंतर कार्टरने आत्महत्या केली. थोडक्यात समाजात संस्कार कमी होत चालले असून, आत्मचिंतन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. माणूस जमिनीवर राहिला तरच किंमत असल्याचे ॲड. निकम म्हणाले. अश्विनी बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. शीतल गायकवाड यांनी आभार मानले.

गिरणा गौरव पुरस्काराचे मानकरी

डॉ. रवींद्र कोल्हे, योगेश निकटगावकर, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, मनपा आयुक्त अनिल पवार, कौशल इनामदार, प्रवीण जोशी, डॉ. राजेश पाटील, मंगेश हडवळ, ॲड. नितीन ठाकरे, बाळासाहेब मगर, स्वाती भामरे, शिवाजी दहिते पाटील, विजयकुमार मिठे, सुवर्णा जगताप, डॉ. सुभाष भालेराव.

हेही वाचा : 

The post Nashik : राजकारणाची अवस्था ओटीटी प्लॅटफॉर्मसारखी : ॲड. उज्ज्वल निकम यांची खंत appeared first on पुढारी.