Nashik : लष्करात नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा, दोन तरुणांना फसविणाऱ्या तोतयास बेड्या

fraud

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना ११ लाख रुपयांना गंडवणाऱ्या बापू छबू आव्हाड या आंबेगावच्या तोतयास लासलगाव पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू छबू आव्हाड हा सैनिकांचा गणवेश घालून व खोटे ओळखपत्र दाखवून सैन्य दलात अधिकारी असल्याचे भासवत होता. सैन्य दलात नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून पाचोरे (ता. निफाड) येथील गणेश सुकदेव नागरे तसेच शिरवाडे येथील आकाश रामनाथ यादव या दोघांची मिळून ११ लाख २० हजारांची फसवणूक केली. फिर्यादी गणेश नागरे तसेच त्याचा मित्र आकाश यादव यांनी आव्हाडच्या सांगण्यावरून त्याच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने ११ लाख २० हजार रुपये फोनपेद्वारे पाठवले होते. मात्र एवढी रक्कम दिल्यानंतरही लष्कराच्या नियुक्तीचे पत्र मिळत नसल्याने त्यांनी बापू आव्हाडकडे वारंवार विचारणी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. नंतर त्याने फोन उचलणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर या दोघांनी पुण्यात मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण कमांडशी संपर्क साधत बापू आव्हाड आणि त्याचे साथीदार सत्यजित कांबळे, राहुल गुरव, विशाल बाबर यांनी पैसे घेऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार फोनद्वारे केली होती. तेथील पाठपुराव्यावरून लासलगाव पोलिस ठाण्यात बापू आव्हाड व या गुन्ह्यात त्याला साथ देणारे त्याचे साथीदार सत्यजित कांबळे, राहुल गुरव, विशाल बाबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व संशयित आव्हाडला अटक करण्यात आली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे व पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : लष्करात नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा, दोन तरुणांना फसविणाऱ्या तोतयास बेड्या appeared first on पुढारी.