Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय

सांदण व्हॅली नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 500 पर्यटक अडकले होते. सध्या परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना व्हॅलीतील मजा लुटण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांधण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी याच व्हॅलीतून जाेरदार कोळसते. काही हौशी पर्यटकांमुळे पर्यटनस्थळी दुघर्टना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी या व्हॅलीत जाण्यास वन्यजीव विभागाकडून पर्यटकांना मज्जाव केला जातो. यंदाही तोच निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.

दरम्यान, हौशी पर्यटकांना रोखण्यासाठी व्हॅलीमध्ये वन्यजीव विभागाकडून प्रवेश मनाईचे फलक लावण्यात येत आहेत. तसेच वनकर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रसंगी संबंधित पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा वन्यजीव विभागाकडून देण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सध्या अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास वीकएण्डला होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन इतर पर्यटनस्थळांबाबत निर्णय घेण्यात येईल.

-गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

पर्यटकांची वाढती गर्दी

पावसाळा सुरू झाल्यापासून निसर्ग आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंद‌िर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसुबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा, तसेच सांदण दरी, रंधा धबधबा आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. विशेषत: वीकेण्डला पर्यटकांची संख्या मोठी असते. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.