Nashik Bakri Eid : आज ईद-उल-अजहा, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

बकरी ईद नाशिक,www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी (दि.२९) मुस्लीम बांधवांची ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद आज साजरी होणार आहे. यानिमित्ताने त्रिंबक रोडवरील अनंत कान्हेरे मैदान लगतच्या ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर सकाळी ईदची विशेष सामूहिक नमाज पठण होणार आहे. खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात सकाळी नमाज अदा होणार असून, यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

दरम्यान, कुर्बानीसाठी लागणाऱ्या बकऱ्यांची खरेदीसाठी बकऱ्यांच्या बाजारांमध्ये गर्दी वाढल्याने बकऱ्यांच्या भावात वाढ झाल्याने विक्रेत्यांची चांदी झाली. बहुतांश मुस्लीम बांधव एन ईदच्या आदल्या दिवशी कुर्बानीसाठी बकरा खरेदीसाठी प्राधान्य देतात. यामुळे बाजारात तेजी आल्याचे चित्र होते. ईद व सलग दोन दिवस कुर्बानीसाठी राखीव असल्याने शनिवारपर्यंत बकऱ्यांना मागणी असेल. आषाढी एकादशी व बकरी ईद एकत्रित आल्याने सर्व नागरिकांनी एकमेकांच्या धार्मिक भावनेचा आदर सम्मान करून सन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशानातर्फे करण्यात आले आहे. ईदगाह मैदानात मनपातर्फे मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. मुस्लीम बांधव सामूहिक नमाजानंतर दर्गा व कब्रस्तानात दर्शनासाठी येतात.

कायद्याच्या चौकटीत राहून कोणत्याही धर्मीयांच्या भावना ना दुखावता धार्मिक पद्धतीने ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद हा सण साजरा करावा. ईदची विशेष सामूहिक नमाज ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदान येथे पावणेदहा वाजता होणार असून, वेळेचे भान ठेवत उपस्थित राहावे.

हाफिज हिसामुद्दीन अशरफी, खतीब-ए-शहर

दोन्ही समाजाचे महत्त्वाचे व पवित्र असे सण असल्याने, दोन्ही समाजांतील व्यक्तींनी एकमेकांच्या रुढी परंपरा व सांस्कृतिक तसेच धार्मिक भावनांचा आदर राखावा. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या सर्वच घटना या सत्य असतीलच असे नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या घटनांची सत्यता पडताळणी करूनच फॉरवर्ड करावे.

दिलीप ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भद्रकाली पोलिस ठाण

मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात नमाज अदा केली जाणार आहे. तिथे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वांनी एकमेकांच्या सणांचा व भावनांचा आदर करीत सण साजरे करावे. या संदर्भात शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

युवराज पत्की, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंबई नाका पोलिस ठाणे

हेही वाचा :

The post Nashik Bakri Eid : आज ईद-उल-अजहा, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त appeared first on पुढारी.