Nashik Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण भोवली, चार वर्षे कारावासाची शिक्षा

तुरुंग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथे रेल्वे स्टेशनमास्तरांच्या कार्यालयात सेवेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला आणि मारहाण प्रकरणी न्यायालयाने तरुणास चार वर्षांचा कारावास आणि ११ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याचे प्रभारी महेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. २३ ऑगस्ट २०१८ रोजी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकात ख्वाजा मोहमंद शेख (३८, रा. देवीचौक, नाशिकरोड) हा एका महिलेस मारहाण करत होता. स्टेशन मास्तर कार्यालयात काम करणारे रेल्वे कर्मचारी आनंदा चाबूकस्वार यांनी धाव घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. तथापि, शेखने त्यांचा शर्ट फाडत धक्काबुक्की केली. चाबूकस्वार स्वतःचा बचाव करण्यासाठी स्टेशन मास्तर कार्यालयात गेले असता आरोपीने त्यांच्या मागे धाव घेत लोखंडी खुर्ची मारली. चाबूकस्वारांच्या हाताला व कपाळाला जखम झाली. आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने स्टेशन मास्तरांच्या टेबलावरील टेलिफोन काचेवर आपटत कार्यालयाचे नुकसान केले. चाबूकस्वार यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अश्विनी पाटील यांनी ख्वाजा शेखला अटक करून नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

लोहमार्गाच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक गणेश शिंदे, दीपक काजवे आदींनी तपासकामी मार्गदर्शन केले. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे प्रभारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जय भवर यांनी सुनावणीदरम्यान वेळोवेळी पाठपुरावा केला. हवालदार संतोष उफाडे, विजय कपिले यांनीही तपासकामी सहाय्य केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. यु. जी. मोरे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी कर्मचाऱ्यायावरील हल्ला हा कायदा सुव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे त्यांनी नमूद करत आरोपीला शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲड. आर. एल. निकम यांनी युक्तिवाद करून नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला चार वर्षे कैद व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद सुनावली. तसेच भारतीय रेल्वे कायद्यानुसार एक वर्ष कैद व एक हजार रुपये दंड ठोठावला. दंडातील दहा हजार रुपये फिर्यादी आनंदा चाबूकस्वार यांना देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

हेही वाचा :

The post Nashik Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण भोवली, चार वर्षे कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.