Nashik Lasalgaon : रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भीक मागो आंदोलन

भीक मागो आंदोलन,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

भरवस – वाहेगांव – गोंदेगाव रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांनी आवाज उठविलेला आहे. या कामाच्या ठिकाणी कामाची माहिती देणारा फलक नसल्याने आज (दि.०९) गोंदेगाव आठवडे बाजारात चिखले यांनी भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनास एक रुपया भीक देऊन नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला.

निफाड पूर्व भागातील भरवस – वाहेगाव – गोंदेगाव रस्ता दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप निलेश चिखले यांच्यासह नागरिकांनी यापूर्वीच केला आहे. बांधकाम विभागाकडे या कामाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र, ती चौकशी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे समजते.

या रस्ताकामाच्या ठिकाणी कोठेही नामफलक लावलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्याचा अंदाजपत्रक, कामाचे स्वरूप, ठेकेदाराचे नाव समजण्यास मार्ग नव्हता. त्यामुळे रस्त्याची चौकशी होईल तेव्हा होईल ; परंतु तत्पूर्वी कामाचे फलक लावण्याची मागणी चिखले यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. त्याआधीही बांधकाम विभागाकडे केलेल्या अर्जात त्यांनी ही मागणी केली होती. त्या अर्जास पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर देखील फलक न लागल्याने निलेश चिखले यांनी आज (दि. ०९) गोंदेगाव आठवडे बाजारात ढोल आणि ताशा वाजवत भीक मागो आंदोलन केले. नागरिकांनी देखील कटोरित पैसे टाकत या आंदोलनास पाठिंबा दिला. आगळेवेगळे आंदोलन असल्याने या आंदोलनाची चर्चा तालुक्यात रंगली होती.

” भीक मागो आंदोलनात जमा झालेली रक्कम निफाड येथील बांधकाम विभागात जमा करणार आहे. या निधीतून तरी रस्ता कामाच्या ठिकाणी फलक लागतील अशी अपेक्षा आहे.”
– निलेश चिखले, सामाजिक कार्यकर्ते, गोंदेगाव.

हेही वाचा :

The post Nashik Lasalgaon : रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भीक मागो आंदोलन appeared first on पुढारी.