Nashik News | निवडणुकीमुळे जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाने पूर्वतयारीस सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात १८ ते २० मे हे तीन दिवस व ४ जूनला मतमोजणीला असे चार दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

लोकसभा निवडणुकीची रंगत चढत असून, अद्याप सर्व उमेदवार जाहीर झालेले नसले तरी कार्यकर्त्यांकडून आखाडे बांधले जात आहेत. आपलाच माणूस ‘भावी खासदार’ अशी स्वप्न कार्यकर्त्यांकडून रंगवली जात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार निश्चित झाल्यानंतरच कार्यकर्त्यांना त्यांचा खासदार कोण असेल याचा अंदाज बांधता येईल. दरम्यान, निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवले जात असते. त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी-विक्री होते. तसेच काळ्या बाजारातील मद्याचीही उलाढाल या काळात सर्वाधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, मतदानाच्या वेळी व मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्ह्यात कोरडा दिवस जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे १८ मे रोजी सायंकाळी सहापासून ते २० मेस मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मद्यविक्री बंद राहणार आहेत. तर ४ जून रोजी होणाऱ्या ममोजणीच्या दिवशीही संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले आहेत.

गुजरातमधील निवडणुकीमुळे सुरगाण्यात बंद

गुजरात राज्यातील काही जिल्ह्यांत लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किमी हवाई अंतरापर्यंतच्या सुरगाणा तालुक्यातील देशी-विदेशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे ५ ते ७ मे दरम्यान सुरगाणा तालुक्यातील सीमेलगतच्या काही भागांतील मद्यविक्रीही बंद राहणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik News | निवडणुकीमुळे जिल्ह्यात चार दिवस 'ड्राय डे' appeared first on पुढारी.