नाशिक पुढारी वृत्तसेवा- मतदान कक्षात मोबाइल नेण्यास बंदी असतानाही काही अतिउत्साही मतदारांनी मतदान करताना व्हिडिओ काढल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले आहे. त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्यात एका २१ वर्षीय मतदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अथर्व राम खांदवे (२१, रा. तारवालानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मतदाराचे नाव आहे. सीडीओ मेरी हायस्कूल येथील १२३-७७ क्रमांकाच्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला. मतदान केंद्रावरील कर्मचारी विजय महाजन (रा. नाशिक) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अथर्व खांदवे या संशयिताविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व याने सोमवारी (दि. २०) दुपारी साडेचारच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेला. त्यावेळी पोलिसांनी त्यास मोबाइल नेण्यास मनाई असल्याचे सांगितले. मात्र, अथर्वने त्याकडे दुर्लक्ष करीत छुप्या पद्धतीने मतदान केंद्रात मोबाइल नेला. तसेच मतदान करताना ईव्हीएमशेजारी कांदा ठेवून अथर्वने मतदान करतानाचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्याने व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी अथर्वचा शोध घेतला. त्याच्याविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर व्हिडिओंचाही शोध
कांदा ठेवून मतदान करणे, कांद्याने उमेदवारापुढील बटन दाबणे, टोमॅटो ठेवून मतदान करण्यासह नियमित मतदानाचेही व्हिडिओ नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात व्हायरल होत आहे. काही युजर्सने त्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केल्या आहेत. नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील सायबर पोलिस संबंधित मतदारांचा शोध घेत आहे.
हेही वाचा –