Nashik ZP : लाखो रुपये लाटणाऱ्या कागदोपत्री वसतिगृहावर मान्यता रद्दची कारवाई

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात रस्ता चाेरीला गेल्याच्या तक्रारीनंतर आता इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असल्याचा देखावा करत लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित वसतिगृहाची मान्यता रद्द केली आहे.

याबाबत जनतेच्या लाखो रुपयांचा गैरव्यवहार करत जिल्हा परिषदेचे पैसे अनधिकृतपणे लाटल्याबाबत फक्त मान्यता रद्द करण्यात आली असल्याने जिल्हा परिषद प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात गुरू नानक छात्रालय हे वसतिगृह उभारल्याचा देखावा करीत समाजकल्याण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यात आले. प्रत्यक्षात संबंधित शाळेजवळ वसतिगृहच नसताना अधीक्षक, पहारेकरी, स्वयंपाकी यांचे पगार तसेच वसतिगृहाचे अनुदान अशी दरवर्षी ३.५ लाखांहून अधिक रक्कम कित्येक वर्षे लाटण्यात आली. या गावातील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी ३ वर्षांपासून त्याचा पाठपुरावा करीत वसतिगृहच अस्तित्वात नसल्याचे म्हणणे सरकारदरबारी मांडले होते. अखेर केवळ कागदोपत्री चाललेल्या या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची थातूरमातूर कारवाई करीत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न समाजकल्याण विभागाकडून करण्यात आला आहे.

वास्तविक जर त्या ठिकाणी वसतिगृहच अस्तित्वात नव्हते, तर त्या वसतिगृहाच्या नावाखाली लाटण्यात आलेले लाखो रुपयांचे अनुदान तसेच सोडून संबंधितांच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचेच कार्य या कारवाईच्या देखाव्यातून करण्यात आले आहे. संबंधित संस्थेचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी मिळून हे सर्व अनुदान वर्षानुवर्षे लाटले असल्याने ते हडप केलेले अनुदान त्यांच्याकडून व्याजासह वसूल करून त्यांना शिक्षा व्हावी, या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

– विठोबा द्यानद्यान, तक्रारदार.

हेही वाचा :

The post Nashik ZP : लाखो रुपये लाटणाऱ्या कागदोपत्री वसतिगृहावर मान्यता रद्दची कारवाई appeared first on पुढारी.