NCP Crisis : निफाडच्या राजकारणाला पक्षाघाताचा झटका

निफाड: दिलीप बनकर, अनिल कदम,www.pudhari.news

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव

राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. या भूकंपाचे धक्के निफाडलाही बसले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी निफाड विधानसभा मतदारसंघ आपला बालेकिल्ला मानला जातो. निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निफाडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तसे पाहिले, तर राष्ट्रवादीचे सर्वांत ताकदवान नेते छगन भुजबळ हेदेखील 40 टक्के निफाड तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हेदेखील मूळचे निफाडचेच. गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र कारभार सुरू करून, ठाकरेंना बाजूला सारीत शिवसेनेवर कब्जा मिळवला. त्या रणधुमाळीत अनिल कदम हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले, तरी अनेक मान्यवर शिंदे यांच्या छावणीत डेरेदाखल झाले आहेत. त्यानंतर लगेच वर्षभरात अजित पवार यांनीदेखील तोच कित्ता गिरवला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. या धडाक्यात छगन भुजबळ आणि दिलीप बनकर हे दोन्ही आमदार अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवार यांना दैवत मानणारे सर्व लहान-थोर पुढारी, नेते, कार्यकर्ते पक्षाघाताचा झटका बसावा, तसे सुन्न झाल्याचे दिसत आहेत. वर्षानुवर्षे शरद पवार आणि अजित पवार यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते पूर्णपणे सैरभैर झाले आहेत. ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ हाच प्रश्न सर्वांना छळतो आहे. तिकडे भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आपले परतीचे दोर कापून घेतले आहेत. परंतु बनकर हे अजूनदेखील सुस्पष्ट व्यक्त होताना दिसत नाहीत. अजित पवार यांच्या शपथविधीला ते हजर होते. त्यामुळे ते अजित पवार यांच्यासोबत आहेत असे म्हणावे, तर कार्यकर्ते म्हणतात बनकर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यातच आता शरद पवार स्वतः मैदानात उतरणार असून, शनिवारी (दि. 8) ते निफाड, येवला भागात येणार असल्याने सर्व जण ‘थांबा आणि वाट बघा’ याच भूमिकेत आहेत. काही नेते मंडळी खासगीत बोलताना प्रेम शरद पवारसाहेबांवर असले, तरी सत्ता अजित दादांच्याकडे असेल, तर त्यांच्याच सोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याचे मान्य करतात. परंतु जाहीरपणे कोणीही काही बोलायला तयार नाही. जी परिस्थिती राष्ट्रवादीची, तीच शिवसेनेचीदेखील आहे. उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या सोबत राहिल्याने भाजपचा पाठिंबा मिळून आमदारकी पदरात पाडून घेण्याची तयारी काही मंडळींनी चालवली होती. त्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावण्याचे काम अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे झाल्याचे निफाड तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचे, हे त्यांना कळेनासे झाले आहे.

काँग्रेस पक्ष बघ्याच्या भूमिकेत

या संपूर्ण घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष फक्त बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात काँग्रेसची ताकद मुळातच कमी असताना सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते मंडळींना पक्षाच्या आदेशापेक्षा तांबे, थोरात यांचा शब्द मोलाचा वाटत होता. काँग्रेसचे सुदैव इतकेच की, त्यावेळी पक्ष फुटला नाही. अन्यथा शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमाणेच काँग्रेसचेही हाल बघावे लागले असते. या सर्व राजकीय खेळखंडोब्यात सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र, पक्षाघात झाल्यासारखे सुन्न झाले आहेत, यात शंका नाही.

हेही वाचा : 

The post NCP Crisis : निफाडच्या राजकारणाला पक्षाघाताचा झटका appeared first on पुढारी.