NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचे अडीच हजार कोटींचे अंदाजपत्रक (NMC Budget) आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि. २८) मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवले. महासभेकडून औपचारिकता पूर्ण करीत दोन हजार ४७७ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 3 मार्च रोजी महापलिकेचे २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर (NMC Budget) केले होते. प्रशासक म्हणून डॉ. पुलकुंडवार यांनी स्थायी समितीपाठोपाठ महासभेला बजेट सादर केले. मंगळवारच्या सभेतच अंतिम मंजुरीही प्रशासक म्हणून डॉ. पुलकुंडवार यांचीच असल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रारूप अंदाजपत्रक २,४७७ कोटींचे अंदाजपत्रक जैसे थे मंजूर करण्यात आले. अंतिम अंदाजपत्रकात कुठलाही बदल झालेला नाही. स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक १.२१ कोटी रुपये दर्शविली. सादर केलेल्या अंदाजपत्राकाद्वारे रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलवाहिका, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी तरतूद करून शहराचा समतोल विकास करणार असल्याचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी म्हटले होते.

ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले होते. स्मार्ट स्कूल, पर्यावरण संवर्धन, नमामि गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी पार्क विकसित करण्याच्या बाबींवर अंदाजपत्रकाच्या माध्यमातून भर देण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा :

The post NMC Budget : अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी appeared first on पुढारी.