पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला ‘कल्पवृक्ष महू’

पिंपळनेर महू www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
‘कल्पवृक्ष महू’ झाडाला येणाऱ्या महू फुलांची पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाड्यातील महिला-पुरुष दऱ्या खोऱ्यात दिसून येत आहेत. साक्री तालुक्यातील गावागावांत मोहफुलांची असंख्य झाडे आहेत. घरासमोर, शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो आहे.

‘कल्पवृक्ष’ महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगारही मिळत आहे. मार्च ते जून या कालखंडात येणारी महू फुले त्यानंतर येणारी टोळी यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ हे वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीची तयारीही आदिवासी महिला घरोघरी करत आहे. पहाटे गोळा करण्यात आलेले महू फुले सुकवून त्यांना साठवून ठेवले जाते. यातून काहीअंशी निर्माण झालेली आर्थिक विवंचना दूर करण्याचा प्रयत्न होतो आहे. मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, पिंपळपाडा, वडपाडा केवडीपाडा, वारिपाडा, मोगरपाडा, मांजरी, वासाॅ, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगांव, खरगाव, पारसरी चरणमाळ, नांदरखी, बसरावळ या गावात सध्या जोरदार महू वेचणी सुरू आहे. गुल्ली महू, रातगोल महू, इंडाल महू, सिकटयाल महू, सिडी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजाती सर्वश्रुत आहेत. फुलाचा हंगाम गेल्यानंतर महू झाडाला येणाऱ्या टोळंबीपासून तेल तयार करण्यात येते. हे तेल पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात खाद्यतेल म्हणून वापरतात.

आदिवासींसाठी रोजगार
महिला पुरुष मोहफुले बाजारात विकून आदिवासींना पैसे मिळतात. या फुलांपासून दारू पण काढली जाते. त्यातूनही उत्पन्न मिळते. फुलांचा हंगाम संपला, की या झाडांना फळे येतात. ही फळे खाण्यासाठी वापरली जातात. त्यातील आठोळीतील गरापासून तेल काढले जाते. हे तेल औषधीयुक्त असून, आदिवासी त्याचा खाण्यासाठी उपयोग करतात. गुरांच्या विविध आजारांवर मोहाच्या फुलातील हा गरऔषधी म्हणून वापरला जातो. मोहाच्या या फळाला टोळ म्हणतात.

विविध आजारांवर मोहफुले गुणकारी
महू फुलांपासून मदिरा (दारू), भाकरी, लाडू, खीर, भजी, आळ भाजलेले महू, राबडी, महू फुलांचे बाँडे, मोहाच्या चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोक्सी, मोहाच्या लाटा, डुकल्या आदी पदार्थ तयार करण्यात येतात. एप्रिल महिना सुरु असल्याने तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. उन्हाळ्यात शरीरात रोगप्रतिकारक्षमता वाढत असल्याचे सांगण्यात आले. पहाटे महू फुलांची गळ होते. महू फुले वेचणी करताना आदिवासी बांधव ठिकठिकाणी दिसून येत आहेत. महू वृक्ष हा डबल उत्पादन देणारे एकमेव वृक्ष असल्याने त्याला ‘कल्पवृक्ष महू’ म्हटले जाते. हा वृक्ष फुले देतो व फळेही देतो.

हेही वाचा:

The post पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला 'कल्पवृक्ष महू' appeared first on पुढारी.