नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘ऑपरेशन गल्ली’ सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चौकीच्या अंमलदारासह अधिकार्‍यांनी संशयितांसह सराईत गुन्हेगार शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यांची उकल होण्यासोबतच गुन्हे प्रतिबंधासाठी खबर्‍यांचे जाळे मजबूत करण्याचे आदेशही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यासाठी हद्दीत संपर्क वाढवण्यास सांगितले असून, संबंधितांसोबत बैठका घेतल्या जाणार आहेत.

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे बंद करून संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिंदे यांनी पोलिस ठाणेनिहाय नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखांसह चार अतिरिक्त पथके कार्यरत आहेत. सर्व बीट चौक्यांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना परिसरनिहाय गुन्हेगारांची यादी करून ‘दादागिरी’ करणार्‍यांनाही रडारवर घेण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार काही दिवसांपासून संशयितांसह गुन्हेगारांची धरपकड सुरू झाली आहे. तसेच पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करून रस्त्यावरील गुन्हेगारी नियंत्रणासाठी नियोजन केले जात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व व्यापारी, लघुव्यावसायिकांसह रिक्षाचालक व हॉकर्सची यादी करण्यात येत आहे. या सर्वांची पोलिस ठाणेनिहाय महिन्यातून एकदा किंवा दोनदा बैठक होणार आहे. पोलिस व व्यावसायिकांमधील संवाद वाढवण्याचा मुख्य हेतू असून, दोघांचा विश्वास वाढल्यास कोणताही गुन्हा, अपघात घडल्यास त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना तातडीने मिळेल, असा उद्देश यातून साध्य केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यावसायिकांना सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले आहेत. त्यास व्यावसायिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पोलिस ठाणेनिहाय सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम appeared first on पुढारी.