Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात

संजय राऊत,www.pudhari.news

जळगाव : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. त्यांच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील, असे राऊत म्हणाले. तर अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत यांचे जळगावात आगमन झाले. यावेळी संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत विचारले असता ते म्हणाले, सर्वांत जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या भाग्यात लिहिलं असेल तर होत असतात. माझ्या अजित पवारांना शुभेच्छा आहे. अजित पवार राष्ट्रवादीतच राहतील, असेही ते म्हणाले.

नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल

2024 मध्ये आम्ही पुन्हा येणार…

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आम्ही आता विरोधी पक्षात असलो तरी, महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री पदाचा विषय नाही. 2024 मधील निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत पाहू असेही संजय राऊत म्हणाले. तर वज्रमूठ सभा ही तीन पक्ष एकत्र घेऊन करत आहेत. तीन पक्षांचा निर्णय असतो की सभा कोठे घ्यायची? सभेत कोणी बोलायचे? हा तिघांचा निर्णय असतो. त्यामुळं कोणतेही वाद नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

सत्य ऐकण्याची हिंमत नाही…

आमच्या बोलण्यामुळे विरोधकांना भीती आणि पोटशूळ उठत आहे. आम्ही जे सत्य बोलत आहोत ते ऐकण्याची आणि सहन करण्याची तुमची हिंमत नाही. आम्ही जंगलात उघड फिरणारे वाघाची औलाद आहोत, तुमचे नेते भाजपचे पोपट म्हणून बोलतात. तुम्ही मांडलिक आहात. गुलाम आहात असे राऊत म्हणाले. काही जण लबाडी करुन सत्ता मिळवतात. शिवसेनेनं सामान्य माणसाला मंत्री केलं, आमदार केलं. शिवसेनेची ताकद आजही कायम आहे. पळून गेलेल्यांना जनता मतपेटीतून उत्तर देईल असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : 

The post Sanjay Raut : अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात appeared first on पुढारी.