शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

उद्धव ठाकरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी घेतली. महाविकास आघाडीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी दिली आहे.

यावेळी शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी सदस्य नोंदणी, संघटना बांधणीसह लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आढावा घेतला. सद्य परिस्थितीत अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख यांना त्यांच्या अडीअडचणी मांडण्याची संधी दिली. यावेळी धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख यांनी शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत भुमिका मांडली.

यावेळी ते म्हणाले, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला आमदार सन 1999 मध्ये निवडून आला. त्यानंतर धुळे ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार झाला. परंतु, मतदारसंघाची पुनर्रचना झालेनंतर शिंदखेडा मतदारसंघ भाजपने युतीत असताना आपल्याकडून मागून घेतला. त्यानंतर सतत तीन वेळा भाजपाचा आमदार या मतदारसंघातून झाला.

हा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लढविला. परंतु त्यांचा चाळीस ते पन्नास हजार मतांनी पराभव झाला. हा मतदारसंघ हिंदुत्ववादी विचार सरणीचा मतदारसंघ असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे गेल्यास पुन्हा महाविकास आघाडीचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्या. आम्ही तुम्हाला आमदार देतो. जिंकून दाखवतो, अशी मागणी हेमंत साळुंके यांनी केली. त्याला शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेकडे शिंदखेडा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी आग्रह धरला.

यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदखेडा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील म्हणून पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. त्यामुळे शिंदखेडा शिवसेना पदाधिकारी व मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले असून पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढीसाठी चंग बांधला आहे. ते येणाऱ्या काळात दिसेलच, असा विश्वास यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, सह संपर्कप्रमुख हिलाल माळी व महेश मिस्त्री, किरण जोंधळे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, भरतसिंग राजपुत, डॉ.सुशिल महाजन, अत्तरसिंग पावरा, छोटुसिंग राजपुत, ललित माळी, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी आकाश कोळी, विधानसभा संघटक गणेश परदेशी, महिला जिल्हा संघटिका ज्योतीताई सिसोदे उपस्थित होत्या.

हेह वाचा  

महत्वाची बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयात १० नोव्हेंबरला सुनावणी  

ट्विटर कंपनीने २५ वर्षीय तरुणाला काढल्‍यानंतर त्‍याने केली अशी पोस्‍ट

The post शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत appeared first on पुढारी.