Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन

उद्योजक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे गुरुवारी (दि.२५) सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सातपूर येथील निमा संकुल परिसरात २५ व २६ एप्रिल रोजी या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या समिटची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे. समिटचे उद्घाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते व जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल दान यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे.

या समिटअंतर्गत २५० पेक्षा अधिक स्टार्टअप आणि शंभरहून जास्त महिला नव उद्योजकांसह आर्थिक बळ लागणाऱ्या उद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनविले आहे, त्यांना समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आर्थिक सहाय्य देणे, गुंतवणूक करणे तसेच जॉइंट व्हेंचर करणे याबरोबरच फक्त अर्थसहाय्य देण्यासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील दोनशेपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनाही पाचारण करण्यात आले आहे. एंजल गुंतवणूकदार, सहयोगी गुंतवणूकदार आणि आर्थिक गुंतवणूकदार यांच्यात समन्वय घडवून आणून स्टार्टअप नव उद्योजक आणि महिला उद्योजिकांना उद्योग उभारणीस बळ देण्याचा प्रयत्न या समिटच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे बेळे यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या समिटमध्ये विविध चर्चासत्रांचे आयोजन होणार आहे. स्टार्टअप, उद्योग उभारणी, पेटंट नोंदणीची माहिती, बँका व शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा या सत्रांमधून उपलब्ध करून दिली जाईल. या समिटमध्ये महिला उद्योजिका आणि स्टार्टअप यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही बेळे यांनी केले. समिटच्या यशस्वीतेसाठी सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, कैलास पाटील, स्टार्टअप समितीचे श्रीकांत पाटील आदींनी केले आहे.