एचएएलच्या हजारो कामगारांनी घेतलेले कष्ट… शेकडो अधिकाऱ्यांची देखरेख… आणि सुमारे चारशे कोटींच्या खर्चातून निर्माण झालेले सुखोई ३०-एस बी १८२ हे एअरक्राफ्ट मंगळवारी (दि. 4) अचानक शिरसगाव शिवारात कोसळले अन् दीड मिनटात उतरणारे विमान काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास वैमानिक बोकील आणि बिश्वास यांनी नेहमीप्रमाणेच सुखोई ३० एस बी १८२ ची चाचणी घेण्यासाठी विमान हवेत उडवले आणि काही क्षणांतच ते विमान हवाई उंचीवरून खाली आले. यावेळी कंट्रोल टाॅवरने वैमानिकांशी संपर्क साधत काही प्रोब्लेम आहे का, असे विचारले असता, संबंधित वैमानिकांनी ‘नो- प्रोब्लेम’चा मेसेज कंट्रोल टाॅवरला दिला होता. मात्र, काही मिनटांतच विमानात तांत्रिक बिघाड होऊन विमान शिरसगाव शिवारातील सुखदेव मोरे यांच्या शेतात कोसळले. सुदैवाने वैमानिक कॅप्टन बोकील आणि बिस्वाल यांनी प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्याने आपला जीव वाचविल्याने यात जीवितहानी टळली. मुख्य बाब म्हणजे परिसरात असलेली नागरी वस्ती एचएएल कारखाना व एचएएल वसाहत यांच्यावर बला आली नाही अन्यथा ही दुर्घटना कल्पनेपलीकडची घडली असती.
अपघातातील विमान 10 वर्ष जुने
- सुखोई- ३० हे विमान रशियन तंत्रज्ञान आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे अत्याधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते.
- ओझर मिग येथील एचएएल कारखान्यात दरवर 16 ते 18 सुखोई ३० चे उत्पादन केले जाते.
- एक सुखोई- ३० लढाऊ विमान तयार करायला सुमारे 400 कोटी रुपये खर्च येतो.
- भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ब्राह्मोस हे दीड टन वजनाचे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता तसेच हवेतल्या हवेत मारा करण्याची अत्याधुनिक सुविधा सुखोई- ३० या विमानात असते.
- या विमानाचा वेग ताशी सुमारे २४०० किलोमीटर असल्याने भारतीय संरक्षण दलाचे सुखोई- ३० हे नाक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- अपघात झालेले हे विमान 10 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे.
- या लढाऊ विमानाची ओव्हरऑइलिंग येथीलच एचएएल कारखान्यात होते.
- याचा खर्च सुमारे 100 कोटींच्या वर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दुर्घटनेकडे गांभीर्याने बघण्याची गरज
या घटनेत विमान चाचणीवेळी कोसळले. दोन महिन्यांपूर्वीच या विमानाची ओव्हरऑइलिंग होऊन ते हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचे नंतर काय झाले, याची अजून काही माहिती नाही, तर याच अपघातात गोरठाण येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्याचीदेखील भरपाई अद्यापही या शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
सहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या अपघातातील वैमानिक एकच
अपघातग्रस्त विमान हे ओव्हरऑइलिंग होऊन याच वर्षी ३१ मार्च रोजी भारतीय हवाई दलाकडे सोपविण्यात आले होते. चाचणीदरम्यान झालेल्या अपघाताने सहा वर्षांपूर्वी निफाड तालुक्यातील गोरठाण येथे झालेल्या सुखोई ३०\२१० या विमानाच्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. दुर्दैवाने त्यावेळी झालेल्या अपघातातील वैमानिकदेखील बिस्वाल हेच होते आणि याही विमानाचे वैमानिक तेच होते.
हेही वाचा –