नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रचार म्हटला की, कार्यकर्त्यांचा लवाजमा, वाहनांचा ताफा, लाउडस्पीकरवरून घोषणा असे काहीसे दृश्य असते. मात्र, अपक्ष उमेदवार यास अपवाद ठरत असून, हटके प्रचाराची रणनीती वापरत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. कोणी दुचाकीवर, तर कोणी एकट्याने पायी फिरून मतदारांकडे मतांचा जोगवा मागत आहे. अर्थात अपक्षांच्या या हटके प्रचाराला मतदार साद घालणार काय? हा प्रश्न आहे.
मतदानाला अवघे आठ दिवस उरल्याने, प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून, अपक्ष तसेच छोट्या पक्षांचे उमेदवारही आपल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. नाशिक लोकसभेच्या रिंगणात एकूण ३१ उमेदवार आहेत. त्यातील १४ उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षांचे, तर उर्वरित १७ उमेदवार अपक्ष आहेत. उमेदवारांची ही संख्या मोठी असली, तरी चारच उमेदवारांचा सध्या बोलबाला आहे. उर्वरित उमेदवार फारसे चर्चेत नसले, तरी प्रचाराची त्यांची रणनीती मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. एका अपक्षाने दुचाकीवरच आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्यकर्ते, वाहनांचा ताफा असा लवाजमा न बाळगता, हा पठ्ठ्या आपल्या दुचाकीवर अनुक्रमांक, निशाणी व स्वत:ची छबी असलेला फलक लावून स्वत:च दुचाकी चालवत प्रचार करीत आहे. त्याने दुचाकीवर छोटा लाउडस्पीकर लावला असून, त्यावर देशभक्तीची गीते वाजविली जात आहेत. ही दुचाकी गल्लीबोळातून फिरत असल्याने, नागरिकांना त्याचे कुतुहूल वाटत आहे.
दुसरा अपक्ष उमेदवार दारोदार न फिरता, शहरातील चौकात हातात फलक घेऊन उभा राहात आहे. या फलकावर स्वत:चे नाव, अनुक्रमांक, निशाणी झळकत असून, येणारे-जाणारे लोक त्याकडे आवर्जून बघत आहेत, तर आणखी एक अपक्ष उमेदवार एकट्यानेच पायी फिरत लोकांकडे मतांचा जोगवा मागत आहे. काही अपक्ष ऑटो रिक्षावर आपले फलक लावून मतांसाठी आव्हान करीत आहेत. अपक्षांचा हा हटके प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत असून, नागरिक त्याकडे आकर्षित होत आहेत. मात्र, ते मतांमध्ये परावर्तित होणार काय? हा प्रश्न आहे.
काहींची नावालाच उमेदवारी
‘मनी पॉवर’ शिवाय निवडणूक अशक्य, असे म्हटले, तर चुकीचे ठरू नये. प्रचार यंत्रणांपासून ते प्रशासकीय पूर्ततेसाठी पावलोपावली पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. बड्या पक्षांचे उमेदवार हा विचार करूनच मैदानात उतरतात. मात्र, काही उमेदवार हौशा-नवशांप्रमाणे रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारात सक्रिय न होता, हे उमेदवार आपल्या दैनंदिन कामात व्यग्र आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य काय, हा प्रश्न आहे.
रविवार ठरणार प्रचारवार
मतदानापूर्वी येत असलेला सुटीचा रविवार (दि.१२) लक्षात घेऊन सर्व उमेदवार शहरात प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, रविवारी सुटी असल्याने, नोकरदार वर्ग घरी असणार, ही संधी साधून, उमेदवार या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. मुख्य पक्षांच्या उमेदवारांनी रविवार लक्षात घेऊन प्रचाराची रणनीती आखली आहे.
हेही वाचा: