अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यातील एकूण ३९ लाख ७९ हजार ६६४ लाभार्थ्यांपैकी १७ लाख २१ हजार २८ म्हणजेच ४३ टक्के लाभार्थ्यांनाच आयुष्मान भारत कार्डचे वितरण झाल्याचे समोर आले आहे. अद्याप जिल्ह्यातील २२ लाख ५८ हजार ६३६ म्हणजेच ५७ टक्के लाभार्थी या कार्डपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग यामध्ये कुठे कमी पडतोय का? किंवा याबाबतची कारणे काय हे बघणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य म्हणजे आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली आहे. दि. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असे वर्णन या योजनेचे केले जात आहे. या योजनेमुळे देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील लाखो लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल. तसेच या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत शासन त्यांचा खर्च करत असते.

या योजनेसाठी आवश्यक असलेले आयुष्मान भारत कार्ड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत काढण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अवघ्या ४३ टक्के लाभार्थ्यांनी हे कार्ड घेतले आहे. त्यामुळे याबाबत आता जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांनी कार्ड घ्यावे यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्यविभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

जिल्ह्यात जवळपास २२ लाख लाभार्थ्यांनी अद्याप कार्ड घेतलेले नाही. त्यामुळे ई-केवायसी करून त्यांनी कार्ड घ्यावे. त्यामुळे ५ लाखांपर्यंत त्यांना मदत मिळेल. आयुष्मान भारत कार्डचे इतर फायदेही त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणार आहेत. -डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

कार्डचा उपयोग काय?
या योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याने आयुष्मान भारत म्हणजेच आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. या कार्डचा वापर करून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. तसेच या कार्डच्या माध्यमातून कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकूनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप ट्रान्स्प्लांट, मोतीबिंदू आदी आजारांवर उपचार केले जातात.

तालुका : आभा कार्डधारक (टक्क्यांमध्ये)
नाशिक : ७६
देवळा : ६९
पेठ : ६१
नांदगाव : ५९
येवला : ५७
सुरगाणा : ५३
कळवण : ५१
त्र्यंबक : ४९
इगतपुरी : ५०
दिंडोरी : ४५
सिन्नर : ४५
बागलाण : ४५
निफाड : ५०
चांदवड : ४३
मालेगाव : ४०
एकूण ग्रामीण : ५१

बागलाण पंचायत : २४
येवला पंचायत : २२
नांदगाव पंचायत : २१
इगतपुरी पंचायत : २०
मनमाड पंचायत : २०
नाशिक महापालिका : १७
मालेगाव महापालिका : १६
सिन्नर पंचायत : ५
एकूण शहरी : १७
एकूण : ४३

हेही वाचा:

The post अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित appeared first on पुढारी.