अहमदनगर जिल्ह्यात लाच घेताना दोन महिला अधिकारी जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पूर्ण केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक लाख 39 हजार पाचशे रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला. त्यातील 62 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दोघा महिला अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे.

रुबीया मोहम्मद हनीफ शेख (सहायक अभियंता) व रजनी पाटील (रा. नाशिकरोड) अशी पकडलेल्या लाचखोरांची नावे आहेत. अहमदनगर येथील पाटबंधारे संशोधन व जलनि:सारण उपविभाग येथे या दोन्ही कार्यरत आहेत. दोन्ही वर्ग एकच्या अधिकारी आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राहुरी तालुक्यातील उंबरे गावात त्यांनी काम पूर्ण केले होते. या कामाच्या बीलापोटी सुमारे आठ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. मंजूर बिल देण्यासाठी शेख यांनी स्वतःसाठी आठ टक्के तर पाटील यांच्यासाठी दहा टक्के प्रमाणे तक्रारदाराकडे एक लाख 39 हजार 500 रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करत सापळा रचला. गुरुवारी शेख यांनी कार्यालयात तक्रारदाराकडून 62 हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच घेताना शेख यांना विभागाने विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच पाटील यांनी लाच घेण्यास दुजोरा दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा –