राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २००० मध्ये भारतातील थाई मगूर नावाच्या माशांच्या शेतीवर बंदी घातली असताना नाशिकमधील अनेक नदी-नाल्यांमध्ये जैवविविधतेला धोका पोहोचविणारा मासा बघावयास मिळत असून, मत्स्य विभागाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी मत्स अभ्यासक करीत आहेत.
हौसेपोटी अनेक मत्स्यप्रेमी हा मासा पाळतात आणि तो मोठा झाल्यावर भीतीपोटी त्याला नदी, नाले आणि तलावात सोडून देतात. हा मासा कॅटफिशच्या गटातील आहे. हा विविध किरणांचा पंख असलेल्या माशांचा समूह आहे. थाई मगूरला शास्त्रीयदृष्ट्या क्लेरियास गॅरीपीनस म्हणून ओळखले जाते आणि हा 3-5-फूट-लांब, हवा-श्वास घेणारा मासा आहे. कोरड्या जमिनीवर तो चालू शकतो आणि कृत्रिम श्वसनामुळे तो चिखलातही वाढू शकतो. स्थानिक माशांच्या प्रकारांवर त्याच्या आक्रमक प्रभावामुळे 2000 पासून थाई मगूर प्रजातींची शेती करण्यास मनाई आहे.
जलपरिसंस्थेला धोका
एका संशोधनानुसार भारतातील मूळ माशांच्या प्रजातींमध्ये ७० टक्के घट होण्यास थाई मगूर मासा जबाबदार आहे. ज्यामुळे जलीय परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. मच्छीमार त्यांना कुजलेले मांस खायला देतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि जलसंस्थेची परिसंस्थादेखील नष्ट होतात. महाराष्ट्रासारख्या अनेक भारतीय राज्यांमध्ये, अस्वच्छ परिस्थितीत मत्स्य शेती केली जाते. ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. उत्तराखंड सरकारने थाई मगूरची शेती केल्याबद्दल सप्टेंबर 2020 पर्यंत असंख्य मत्स्य उत्पादकांना अटक केली होती. महाराष्ट्र सरकारने 32 टनांहून अधिक थाई मगूर नष्ट केले आहे. अनेक निर्बंध आणि बंदी असतानाही या प्रजातींची बेकायदेशीरपणे निर्मिती आणि सर्रास विक्री केली जात आहे.
प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे भारतातील अनेक मासळी बाजारात थाई मगूरचे उत्पादन सुरू आहे. त्याचा सर्वभक्षी आहार आहे, जमिनीवर टिकून राहू शकतो आणि वनस्पतींमध्येदेखील हा मासा लपतो. इतर सी-फूडच्या तुलनेत या माशांची किंमत कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेतही या माशांना मोठी मागणी आहे. अलीकडेच ठाण्यातील ग्रामीण भागातील 125 हून अधिक कृत्रिम तलावांमध्ये बेकायदेशीररीत्या उत्पादित हजारो टन प्रतिबंधित कॅटफिश स्थानिक अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. थाई मगूर नावाचा मासा भारतात बंदी असला तरी उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात तो आढळतो. या मासळीची व्यावसायिक किंमत असल्याने बेकायदेशीरपणे विक्री केली जाते. ही आक्रमक प्रजाती ओडिशाच्या काही भागांमध्ये, विशेषतः कटकच्या टांगी चौद्वार ब्लॉकमध्येदेखील आढळत होती.
कोरड्या भूभागावर राहणारा मासा
थाई मगूर हा मासा तीन ते पाच फूट लांब वाढतात आणि दोन ते तीन महिन्यांत तीन ते चार किलो वजन होते. मासे त्यांच्या श्वासोच्छवासाच्या क्षमतेमुळे अन्न किंवा योग्य निवासस्थानाच्या शोधात कोरड्या भूभागावरदेखील राहू शकतात. हे मंद गतीने किंवा स्थिर पाण्यात राहतात आणि सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकते.
आरोग्यावर होणारे परिणाम
एका अभ्यासानुसार, थायलंड मगूरचे सेवन केल्याने कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हा मासा कर्करोगजन्य असल्याने डॉक्टर हा मासा टाळण्याचा सल्ला देतात. याशिवाय, थाई मगूरमध्ये माशांच्या उवा किंवा अर्गुलोसिससारखे रोग निर्माण करणारे परजीवी असतात. एपिझुटिक प्रादुर्भावामुळे मत्स्यपालन कार्यावर घातक परिणाम होऊ शकतो.
ही प्रजाती बाहेरच्या देशातून आपल्याकडे आली आहे. फिश फार्मिंग करण्यावर आम्ही नियंत्रण आणू शकतो. पण नेचरला कंट्रोल करणे शक्य नाही. अवैध फिशिंग करणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करीत आहोत. या माशांविषयी मत्स्य विभागातर्फे जनजागृतीदेखील करीत आहोत.
– विनोद लहारे, परवाना अधिकारी, मत्स्य विभाग, मुंबई.